व्हिटीसी फाटा ते कवडदरा पर्यंतच्या समृद्धी महामार्ग बाधितांना वाढलेल्या महागाईनुसार मोबदला द्यावा : इगतपुरी तालुका भाजप पदाधिकाऱ्यांची ना. गडकरी यांच्याकडे मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. ४

व्हिटीसी फाटा ते कवडदरा पर्यंतच्या समृद्धी महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनींना तीन वर्षात वाढलेल्या महागाईच्या अनुषंगाने मोबदला द्यावा. झाडे, घरे, पोल्ट्री व्यवसाय आणि इतर व्यवसाय असणाऱ्या बाधितांना सुद्धा वाढीव दराप्रमाणे भरपाई द्यावी. घोटी सिन्नर महामार्गाचे चौपदरीकरण करावे. इगतपुरी तालुक्यातील वाहनधारकांना कायमस्वरूपी टोलमाफी द्यावी. यासह इगतपुरी तालुक्यातील खराब रस्त्यांसाठी भरीव निधी द्यावा अशा मागण्या भाजपाचे इगतपुरी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कडभाने आदींसह पदाधिकाऱ्यांनी केली आहे. केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी, ना. भारती पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्रमात भाजप पदाधिकाऱ्यांनी विविध प्रश्न मांडून न्याय मिळावा अशी मागणी केली.

यावेळी ना. नितीन गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून विविध विषयांवर चर्चा केली. त्यांनी समृद्धी प्रकल्पबाधित शेतकरी आणि व्यावसायिकांना योग्य मोबदला देण्याची सूचना केली. घोटी सिन्नर महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात वर्गीकरण झाल्याने चौपदरीकरण लवकर सुरू करावे असेही ना. गडकरी यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले. नाशिक येथील हॉटेल ताज येथे कार्यकर्ता संवाद बैठक पार पडली.

यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. भारती पवार, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष केदाजी आहेर, जिल्हा संघटन सरचिटणीस सुनील बच्छाव, जिल्हा सरचिटणीस भुषण कासलीवाल, नाशिक महानगर अध्यक्ष गिरीष पालवे, आमदार सीमा हिरे, राहुल आहेर, महापौर सतीश कुलकर्णी, भाजपचे इगतपुरी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कडभाने, जिल्हा नेते पांडुरंग बऱ्हे, प्रदेश नेते महेश श्रीश्रीमाळ, जिल्हा चिटणीस सीमा विलास झोले, संघटना सरचिटणीस तानाजी जाधव, सरचिटणीस कैलास, सोमनाथ सहाणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!