इगतपुरीनामा न्यूज, दि. २५
इगतपुरी तालुक्यात हंगामातील पावसाचे योग्य वेळेवर आगमन होणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यामुळे खरीपाच्या तयारीला वेग आला असुन शेतकऱ्यांसह तालुक्याचा कृषी विभागही सज्ज झाला आहे भात लागवडीत अग्रेसर असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात यंदा 32 हजार 237 हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट्य आहे. 28 हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात येणार आहे.
तालुक्यात 126 महसूली गावे व वाड्यामधील शेतकरी भात, वरई, नागली, सोयाबीन, खुरासणी, मका आदी पिके घेतात. शेतकरी इंद्रायणी, फुले समृद्धी, एक हजार आठ, सोनम, गरी, हाळी, कोळपी या जातीचे भात पिक घ्यायला प्राधान्य देतात. तालुक्याचे खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र 23 हजार 332 हेक्टर असुन यंदाच्या खरीप पेरणीचे ऊद्दिष्ट्य 32 हजार 830 हेक्टर असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तंवर यांनी दिली.
मागील वर्षी 27 हजार 831 हेक्टरचे उद्दीष्ठ होते तर एकत्रित 2730 मिलीमी पावसाची नोंद घेण्यात आली होती. इगतपुरी ह्या भातपिकासाठी प्रसिद्ध असलेल्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. यामध्ये प्रामुख्याने इंद्रायणी, गरी, कोळपी, 1008, वाय.एस.आर, हळे, पूनम, डी १००, ओम 3, सेंच्युरी, ओम श्रीराम 125, रुपाली, रुपम, विजय, आवणी, लक्ष्मी, खुशबू, सोनम, दप्तरी 1008, वर्षा, राजेंद्र, बासमती आदी प्रमुख भात जाती या तालुक्यात घेतल्या जातात.
खतांच्या वाढणाऱ्या किमती, बी बियाणे, औषधे वापरून शेतकरी मेटाकुटीस आला आहे. खतांच्या किंमतीत दरवर्षी दहा टक्यानी वाढ होत आहे तर भाताला दरवर्षी भाव आहे तोच राहतो. त्यात कोरोना आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना जेरीस आणलेले आहे. यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी तालुका कृषी विभागाकडून तालुक्यातील विविध गावांमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या माध्यमातुन पीक प्रात्याक्षिकांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच मृद आरोग्य अबाधित राखण्यासाठी 126 गावांमधील मातीचे नमूने घेण्यात आले आहेत. गाव पातळी वर मृद आरोग्य पत्रिकेत शिफारस प्रमाणे खत वापरण्यावर मार्गदर्शन करण्यात येत आहे. गटामार्फत बांधावर खत वाटप करण्यात येणार आहे.
असे आहे खरीपाचे नियोजन
पीक आणि कंसात लागवडीचे उद्दिष्ट्य क्षेत्र हेक्टरमध्ये : भात – 28 हजार 00, नागली – 917, मका 122, कडधान्ये – 190, भईमुग 368, सोयाबीन – 911 खुरासणी – 600
इगतपुरी तालुक्यात भात हे प्रमुख पीक आहे. उत्पादन चांगल्या प्रमाणात व्हावे या उद्देशाने सुचनांचा अवलंब करण्यात यावा. ग्लोरीसीडीयाचा वापर, ओळींद लागवड करण्यासाठी 15 बाय 25 सेटींमीटर युरीया ब्रिकेटचा अवश्य वापर करुन पारंपारीक चतुःसुत्रीचा वापर करण्यात यावा.
- शितलकुमार तंवर, तालुका कृषी अधिकारी, इगतपुरी