सत्ताधाऱ्यांची एकतर्फी घमेंड उतरवून संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युती सत्तेत येईल – शिवसेना नेते भास्कर जाधव : संभाजी ब्रिगेडचा राज्यस्तरीय वर्धापनदिन नाशिक येथे प्रचंड उत्साहात

दीपक भदाणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेच्या युतीमुळे महाराष्ट्राचे राजकीय ध्येय साध्य होऊन सामान्य नागरिकांचे राज्य येईल. देशात डॉ.बाबासाहेब आंबेडकर निर्मित संविधानाला अभिप्रेत असणारी लोकशाही, राज्यकारभार आणि राज्यसत्ता आपल्याला पाहिजे आहे.देशात भीती वाटावी असा राज्यकारभार सुरु आहे. सत्ताधाऱ्यांची एकतर्फी घमेंड असून लोकशाही संपवून हुकूमशाही आणण्याचा त्यांचा मानस आहे. ते मोडून काढण्यासाठी पहिला प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला. देशात माजलेला अनागोंदी कारभार संपवण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि अनेक पक्षांची ताकद शिवसेना पक्षाला मिळाली आहे. शिवरायांचा भगवा आपल्या हाती असून आपले सरकार आल्याशिवाय राहणार नाही.नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण युतीच्या माध्यमातून कटीबद्ध होऊ असे प्रतिपादन शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी केले. विविध पुरोगामी विचारांची दुर्मिळ शिदोरी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रेरणादायी ऊर्जा निर्मित करण्यासाठी राज्यातील महत्वपूर्ण असणाऱ्या संभाजी ब्रिगेडचा वर्धापनदिन दादासाहेब गायकवाड सभागृह मुंबई नाका नाशिक येथे प्रचंड उत्साहात संपन्न झाला. यावेळी मार्गदर्शन करतांना श्री.जाधव बोलत होते. ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी सर्वांना एकत्र करून चालवलेला कारभार सर्वांसाठी दखलपात्र आणि कौतुकाचा ठरला. केंद्र सरकार आणि सध्याच्या राज्य सरकारवर त्यांनी यावेळी टीका केली. भारतीय जुमला पार्टी असे भाजपचे नामकरण त्यांनी केले. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची झालेली राजकीय युती जगभरात कौतुकाचा विषय ठरली आहे. देशातला आणि राज्यातला राजकीय दहशतवाद थांबण्यासाठी ही युती अतिशय महत्वाची ठरणार आहे. संभाजी ब्रिगेडबद्धल अनेक अपप्रचार केला जातो.मात्र ह्या संघटनेमध्ये सर्वच जातीधर्माचे कार्यकर्ते सहभागी आहेत असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांनी यावेळी व्यक्त केले.

संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेच्या युतीमुळे देशातली आणि राज्यातली भाजपची पिलावळ हद्दपार होणार आहे. ब्रिगेडने घेतलेली राजकीय भूमिका संविधान आणि महामानवाला अभिप्रेत असणारी व्यवस्था निर्माण करायला उपयोगी ठरेल. गरिबी, दारिद्र्य निर्माण करायला प्रस्थापित राजकारण्यांची भूमिका कारणीभूत आहे. आम्ही सत्तेमध्ये नसलो तरी आमचा आत्मविश्वास आम्हाला निश्चितपणे सत्तेवर नेवून पोहोचवेल. यानंतर महापुरुषांच्या विचारांवर चालणारे राज्य उभे राहील. अनेक वर्षांपासून संघर्षाची वाटचाल करतांना सध्याचा विषवृक्ष नेस्तनाबूत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असे मनोगत संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर बनबरे यांनी व्यक्त केले. सावरकर प्रकरण, महिलांचा अपमान यांचा त्यांनी खरपूस समाचार घेऊन शिवरायांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांच्यावर कडक टीका करून अवमूल्यन केल्यास गाठ संभाजी ब्रिगेडशी असल्याचा इशारा दिला. महाराष्ट्राची भूमी गद्दार लोकांना गाडून टाकेल असे सांगत त्यांनी विविध विषयांवर आपल्या स्वतंत्र शैलीत उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारच्या काळातील कामांचे कौतुकही केले. भाजप आणि आरएसएसच्या हिंदुत्वाचे त्यांनी वाभाडे काढले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे म्हणाले की संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युती फेविकॉलने घट्ट झाली असून पाच सत्ता ताब्यात आणण्यासाठी आपण प्रहार करणार आहोत. शेतकरी, कष्टकरी,  कामगार, महिला, विद्यार्थी, युवक यांच्यासाठी काम करणारी संघटना संभाजी ब्रिगेड आहे. महापुरुषांचा विचार देशात रुजवणे महत्वाचे आहे. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीच्या माध्यमातून सत्तेची क्रांती उभी करूया असे ते शेवटी म्हणाले. नाशिक येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक सभागृहात ह्या कार्यक्रमासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आणि राज्याबाहेरून कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. प्रारंभी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या आदिवासी नृत्यपथकाने उपस्थितांची मने जिंकली. जिजाऊ वंदना आणि महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन उपस्थित मान्यवरांनी केले. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, संभाजी राजे आदी महापुरुषांच्या घोषणा आणि संभाजी ब्रिगेड शिवसेना युतीचा विजय असो अशा लक्ष्यवेधी घोषणानी सभागृह दणाणुन गेले होते. तुमचे आमचे नाते काय ? जय जिजाऊ, जय शिवराय अशा गर्जना सुरूच होत्या. बालकांच्या हातातील मशाल पेटवून मान्यवरांनी कार्यक्रमाला सुरुवात केली. नाशिक संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष तथा स्वागताध्यक्ष डॉ. स्वप्नील इंगळे यांनी स्वागतपर भाषणात संभाजी ब्रिगेडच्या वाटचालीचा धावता आढावा घेतला. गावागावात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडचे सर्व दिवे एकत्र होऊन दिपस्तंभ आगामी निवडणुकीत मोठे यश देईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी प्रास्ताविकात 31 वर्षाची वाटचाल विषद केली. बहुजनांच्या ताब्यात पंचसत्ता घेण्यासाठी आम्ही मोठे यश मिळवले. शिवाजी महाराजांचे नाव असणारी शिवसेना आणि संभाजी महाराजांचे नाव असणारी संभाजी ब्रिगेड यांची युती झालेली आहे. सध्याच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारने लोकांची पिळवणूक केली असून जाणीवपूर्वक गलिच्छ राजकारण केले जात आहे. विविध आरक्षण मिळवण्यासाठी आपल्याला एकत्र येऊन आपल्या युतीला पुढे न्यायचे आहे. न्यायसंस्था सुद्धा जबरी प्रवृत्तीने हाती घेऊन दडपशाही सुरु आहे. यासाठी ह्या यु्तीमुळे राजकीय समीकरणे बदलली असून आपण एकत्र येऊन यशाची शिखरे नक्कीच सर करू असे ते म्हणाले.

शेतकऱ्यांचे रक्तशोषण करणाऱ्या प्रवृत्तीकडून शेतकऱ्यांनाच संपवण्याचे कारस्थान आजच्या काळातील वामन प्रवृत्ती बळीचे राज्य नेस्तनाबूत करीत आहे.इतिहासाची मोडतोड करून भाजप आणि तत्सम प्रवृत्ती अठरापगड जातींमध्ये तेढ निर्माण करीत असून संभाजी ब्रिगेडने अशा प्रवृत्तीला गाडण्याचे काम केले असल्याचा अभिमान वाटतो असे आक्रमक प्रतिपादन प्रदेश संघटक सुदर्शन तारक यांनी आपल्या खरमरीत भाषेत केले. घंटा वाजवणाऱ्या लोकांचा तीव्र विरोध करून अखंडित राष्ट्र उभे करण्यासाठी संभाजी ब्रिगेड कार्यरत असेल असे ते शेवटी म्हणाले. प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार यांनी आरएसएस आणि गुणरत्ने प्रवृत्तीवर थेट टीका करून चंगू-मंगू प्रकाराचा समाचार घेतला.आगामी निवडणुकीत ताकदीने उभे राहून संभाजी ब्रिगेडची शक्ती दाखवा असे आवाहन त्यांनी केले.सहसंघटक मनोज गायकवाड म्हणाले की, महाराष्ट्राला तोडण्याचे काम सध्याची राजसत्ता करीत असून हिंदुराष्ट्राच्या नावाखाली लोकांची दिशाभूल केली जात आहे.जनतेच्या प्रश्नांकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात येत आहे. राज्याची सगळ्या क्षेत्रात अधोगती करण्यात आली असून अन्य राज्ये पुढे जात आहेत.संभाजी ब्रिगेड हीच संघटना महाराष्ट्राला वाचवू शकते असेही ते म्हणाले. प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी महाराष्ट्र शासनावर कठोर शब्दांत आसूड ओढले. संभाजी ब्रिगेडकडे एकदा सत्ता द्या,आपण सगळ्यांना सुतासारखे सरळ करू. शिवरायांचा अवमान करणाऱ्या लोकांच्या पाठीशी असणारे राज ठाकरे यांना दीड दमड्याचा अशी त्यांनी उपमा दिली.राज्यपाल कोश्यारी यांच्यावर त्यांनी टीका करून सगळ्यांना धडा शिकवण्यासाठी आपण सज्ज असल्याचे ते शेवटी म्हणाले. सावरकरांना वाचवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या शिवद्रोही राज ठाकरेकडुन शिवरायांचे अवमूल्यन झाले असून अशा चोमड्या लोकांमुळे राज्याची वाट लागली आहे असे मनोगत शिव व्याख्याते तुषार उमाळे यांनी त्यांच्या संतप्त भाषेत व्यक्त केले. महापुरुषांच्या बदनाम्या करण्याचे षडयंत्र थांबले नाही तर आम्ही खपवून न घेता आमचा दणका देऊ असे ते शेवटी म्हणाले. सिल्वासाचे किशोर जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.

सूत्रसंचालन डॉ. दिलीप चौधरी यांनी तर आभार प्रफुल्ल वाघ यांनी मानले. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे, प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे, उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, शिवसेना नेते सुनील बागुल, दत्ता गायकवाड, रंजना बोराडे, प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे, राज्य कोषाध्यक्ष गजानन पारधी, संतोष गाजरे, राज्य उपाध्यक्ष प्रदीपकुमार तुपेरे, सुहास राणे, चंद्रकांत वैद्य, अभिमन्यू पवार, संघटक चंद्रकांत वैद्य, संतोष शिंदे, उमाकांत उफाडे, डॉ. बालाजी जाधव, प्रेमकुमार बोके आदी उपस्थित होते. नाशिक जिल्हाध्यक्ष तथा स्वागताध्यक्ष डॉ. स्वप्नील इंगळे, नाशिकचे निरीक्षक डॉ. संदीप कडलग, महानगरप्रमुख प्रफुल्ल वाघ, जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील, उपजिल्हाप्रमुख विशाल अहिरराव, सरचिटणीस विकी गायधनी, लोकसभा अध्यक्ष शरद लभडे, मंदार धिवरे, सागर पाटील, अक्षय आठवले, हरेश्वर पाटील, राकेश जगताप, संकेत चराटे, चेतन पगारे, प्रथमेश पाटील, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र निंबाळते, बाळासाहेब ठाकरे, विशाल देसले, कल्पना रेवगडे, सुमन हिरे, मनिषा कोल्हे, संगीता पाटील, पूजा इंगळे, कल्याणी वाघ, शेखर पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

Similar Posts

error: Content is protected !!