इगतपुरी तालुक्यात कोविड मदत कक्ष ग्रुपच्या प्लाझ्मादान चळवळीला यश ; काही मिनिटांत रूग्णांना मिळतात खाटा, ऑक्सिजन आणि प्लाझ्मा

इगतपुरीनामा न्यूज, दि. ११
इगतपुरी तालुक्यात कोरोनाचा फैलाव वाढून ऍक्टिव्ह रूणसंख्येने उच्चांक गाठला होता. अशा परिस्थितीत रुग्णांसह नातेवाईकांना विविध प्रकारच्या अडचणी निर्माण होतात. अशा संकटकाळात संबंधित रुग्ण आणि नातेवाईकांच्या सहकार्यासाठी काही दिवसांपूर्वी कोविड मदत कक्ष ग्रुप इगतपुरीची स्थापना झाली. अवघ्या काही दिवसात या ग्रुपमार्फत अनेक गरजु रुग्णांना काही मिनिटांत प्लाझ्मा दान करणारे दाते उपलब्ध करण्यात आले. तर अनेकांसाठी रूग्णांलयात खाटा उपलब्ध करण्यासाठी ग्रुपची मदत झाली. माणिकखांब येथील माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून स्थापित ह्या ग्रुपकडून विविध सामाजिक कामे होत असल्याने तालुक्यात आनंद व्यक्त होत आहे.
एरवी सोशल मिडियांवर तासनतास तरुणाई वेळ वाया घालवते अशी टिका केली जाते. परंतु कोरोना काळात समाज माध्यमाचा वापर सकारात्मकरित्या होताना दिसतो आहे. कोरोना काळात गरजू रुग्णांना मदतीच्या हेतुने माणिकखांबचे माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण यांनी व्हॉट्सअँप ग्रुपची स्थापना केली. बघता बघता ही एक चळवळ होत असून अनेक होतकरू तरूण ग्रुपशी जोडले गेले आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांचे संपूर्ण सहकार्य ह्या ग्रुपला लाभत आहे.

असे चालते काम
एखाद्या रुग्णांला उपचारार्थ प्लाझ्माची आवश्यकता असेल तर या ग्रुपवर या संदर्भातील माहिती नोंदवली जाते.  या नंतर ग्रुपच्या सदस्याकडून प्लाझ्मा दात्याचा शोध घेतला जातो. संबंधित रूग्णांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला जातो. रक्तपेढीत रक्त संकलन होईपर्यंत पूर्णपणे पाठपुरावा केला जातो. याशिवाय कुठल्याही गरजू रूग्णांला व्हेंटिलेटर बेड, ऑक्सीजन बेड, इंजेक्शन उपलब्ध करून दिले जाते. कोविड टेस्ट कुठे आणि केव्हा करावयाची यांसदर्भात पडताळणी व मार्गदर्शन केले जाते.

सामाजिक जाणिवेतून कार्याची प्रेरणा

सामाजिक जाणिवेतून आमचा ग्रुप काम करत आहे. आतापर्यंत इगतपुरी तालुक्यामध्ये शेकडो गरजू रुग्णांना प्लाझ्मा उपलब्ध करून देण्यात यश आले आहे. या चळवळीतून सदस्य युवकांच्या युवाशक्तीचे दर्शन घडविताना रुग्णांना वेळीच मदत होते. अनेकांना जीवदान दिल्यामुळे ग्रुपचा हेतू साध्य झाला आहे. यापुढेही प्लाझ्मा, बेड, इंजेक्शन आदींबाबत मदतकार्य सुरू राहील.
हरिश्चंद्र चव्हाण, ग्रुप संस्थापक तथा माजी सरपंच माणिकखांब

कोविड मदत ग्रुपला संपूर्ण सहकार्य करू

इगतपुरी सारख्या आदिवासी तालुक्यात कोरोनाच्या संकटकाळात नागरिकांना तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी मी आणि माझे सहकारी तत्पर आहोत. त्यानुसार आमचे मित्र हरिश्चंद्र चव्हाण यांच्या ग्रुपला आम्ही साहाय्य करतो आहे. ह्या ग्रुपच्या माध्यमातून रोज स्वतः पुढे होऊन आम्ही चांगले कार्य करत आहोत. स्वखर्चाने 2 रुग्णवाहिका सुद्धा दिल्या आहेत. आगामी काळात काम सुरूच राहील.
– गोरख बोडके, माजी जिल्हा परिषद सदस्य

प्लाझ्मादान कार्याबाबत ही बातमी अवश्य वाचा

https://igatpurinama.in/archives/1858

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!