इगतपुरीनामा न्यूज, दि. ९
रक्तदाना इतकेच प्लाझ्मादानही श्रेष्ठ दान आहे. प्लाझ्मा दान केल्याने काहीही त्रास होत नाही. त्यातून गरजूंचा जीव नक्की वाचू शकतो. इगतपुरी तालुक्यात जे कोरोनातून बरे झालेले लोक आहेत त्यातील प्लाझ्मादानासाठी बरेच जण पात्र असू शकतात. या सगळ्या योद्ध्यांनी जास्तीत जास्त पुढाकार घेऊन प्लाझ्मा दानाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवावा. यासाठी आवश्यक ती सर्व मदत कोविड १९ मदत ग्रुप इगतपुरी तालुका यांच्या माध्यमातून केली जाईल असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, ग्रुपचे संस्थापक हरिश्चंद्र चव्हाण, श्रीकांत काळे, किरण फलटणकर, शरद हांडे, भास्कर सोनवणे यांनी केले आहे.
तालुका आरोग्य अधिकारी काय म्हणतात ?
इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी सांगितले की, प्लाझ्माचा प्रयोग अनेक ठिकाणी सुरू आहे आणि त्यामध्ये यशही मिळत आहे. साधारणपणे दहापैकी नऊ केसेसमध्ये प्लाझ्मा दिला गेला ते रुग्ण बऱ्यापैकी लवकर बरे झाले असा त्यातला अनुभव आहे. आपल्या शरीरातील रक्तातून पेशी बाजूला काढल्या तर जे पिवळे द्रव्य उरते तो प्लाझ्मा. त्याच्यामध्ये ज्या अँटीबॉडीज असतात त्या आपल्या शरीराच्या खऱ्या अर्थाने डिफेन्स मॅकॅनिजम असतात. ज्या व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी उपयुक्त असतात.
प्लाझ्मा कोण देऊ शकतो याबाबत डॉ. स्वरूपा देवरे सांगतात
इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. स्वरूपा देवरे यांनी प्लाझ्मा कोण देऊ शकतो याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, जी व्यक्ती १८ ते ६० वयोगटातील असेल, हिमोग्लोबिन ( HB ) १२.५ टक्के असेल, वजन साधारणपणे ५० किलोपेक्षा जास्त असेल, कोमॉर्बीडीटी नसेल म्हणजेच रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, मुत्रपिंड, हृदयविकार नसतील अशा लोकांचा प्लाझ्मा आपल्याला घेता येतो. जे लोक कोरोनाबाधित बरे होऊन २८ दिवस झाले आहेत त्यांना प्लाझ्मा दान करता येतो. प्लाझ्मा देत असताना प्लाझ्माफेरीसीस यंत्रातून काढला जातो. यामध्ये जो दाता आहे त्याचा प्लाझ्मा कम्पलसरी ट्रायटेट केला जातो आणि त्या ठिकाणी १:६४ अशा पद्धतीने ते असेल तर तो प्लाझ्मा पात्र असतो.
गोरख बोडके यांचे आवाहन
प्लाझ्मा दानासाठी योग्य प्रकारे समुपदेशन करता आले पाहिजे. प्लाझ्मा देणे हे एक खूप श्रेष्ठदान आहे, हा विश्वास त्याला वाटणे हे महत्वाचे आहे. त्यासाठी त्याचे प्रबोधन करणे, प्रोत्साहित करणे, प्लाझ्मा दानासाठी प्रवृत्त करणे महत्वाचे आहे. इगतपुरी तालुका वासीयांनी प्रतिसाद दिला तर नक्कीच प्लाझ्मा डोनेशनच्या कार्याला हातभार लागू शकतो. कोरोनाच्या विरुद्ध लढण्याच्या दृष्टीकोनातून या कार्यामध्ये आपण हातभार लावावा, असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी केले आहे.
ग्रुपचे संस्थापक हरिश्चंद्र चव्हाण यांचे आवाहन
काही दिवसांपासून इगतपुरी तालुक्यातील अनेकांनी प्लाझ्मादान केले असून त्यामुळे कोणाचा तरी जीव वाचणार आहे. म्हणून कोणालाही प्लाझ्मादान करायचे असेल तर त्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात येईल असे संस्थापक अध्यक्ष हरिश्चंद्र चव्हाण यांनी सांगितले. यासाठी सोबतच्या पोस्टरवरील कोणत्याही क्रमांकावर संपर्क साधावा.
Comments