
इगतपुरीनामा न्यूज – जागतिक स्तरावर शक्ती क्रीडा क्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेची मानली जाणारी World Championship 2025 स्पर्धा मॉस्को रशिया येथे दिमाखात पार पडली. या भव्य स्पर्धेत ३० देश, ८० राज्य , ४२९ शहरे, एकूण ३ हजार ३४ आंतरराष्ट्रीय स्पर्धकांनी सहभाग घेतला. ज्यात ६०३ महिला आणि २ हजार ४३१ पुरुष खेळाडू होते. ह्या उच्चस्तरीय स्पर्धेत भारताचा युवा खेळाडू हर्ष प्रमोद व्यास याने आपल्या अद्वितीय कामगिरीने जगभरातील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. हर्ष व्यास हा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील रहिवासी आहे. एकूण पदक तालिकेत इराणने प्रथम, रशियाने द्वितीय तर भारताने तृतीय क्रमांक पटकावत जागतिक पटलावर आपली ताकद सिद्ध केली. भारताच्या या उल्लेखनीय यशात हर्ष व्यास याच्या पदकांची मोलाची भर पडली. २० ते २३ वयोगटातील ज्युनियर विभागात स्पर्धा करत असूनही हर्ष व्यास यांनी उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, अपूर्व शारीरिक सामर्थ्य आणि विलक्षण मानसिक दृढतेच्या जोरावर पाच आंतरराष्ट्रीय पदके जिंकत भारताला गौरवाचे पाच सुवर्णक्षण प्रदान केले. फुल पॉवरलिफ्टिंगमध्ये कांस्य पदक, पॉवर स्पोर्ट, पुष-पुल पॉवरलिफ्टिंग, पुष-पुल ड्रग टेस्टेड व डेडलिफ्टमध्ये प्रत्येकी १ सुवर्ण पदक असे ५ पदक आहेत. या पाचही पदकांनी हर्ष व्यास यांनी जागतिक पातळीवर भारताचे सामर्थ्य आणि प्रतिभा दाखवून दिली. स्पर्धेदरम्यान त्यांच्या प्रत्येक लिफ्टला उपस्थित प्रेक्षकांकडून प्रचंड टाळ्यांचा कडकडाट मिळत होता. हर्ष व्यास सध्या डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी अंतर्गत सिंडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स येथे शिक्षण घेत आहे. त्यांच्या शैक्षणिक संस्थेसह सिंडनहॅम अल्युम्नी असोसिएशने त्यांच्या रशिया प्रवासासाठी मोठे योगदान देत संपूर्ण प्रायोजकत्वाची जबाबदारी स्वीकारली. विजयानंतर हर्ष व्यास म्हणाले की, भारत माता हीच माझे सर्वोच्च प्राधान्य आहे. माझ्या मातृभूमीचे प्रतिनिधित्व करणे हा माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान आहे. मी नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांकडून धैर्य, शौर्य आणि स्वाभिमान शिकतो. आज मी जिंकलेले हे पदक फक्त माझे नाही ते माझ्या देशाचे, महाराष्ट्राचे, माझ्या इगतपुरी शहराचे आणि मला निस्वार्थ साथ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आहे. हर्षच्या यशाबद्धल वडील प्रमोद व्यास, आई भाग्यशाली व्यास आणि इगतपुरी तालुक्यातील विविध मान्यवरांनी आनंद व्यक्त करून अभिनंदन केले आहे.