इगतपुरीनामा न्यूज, दि. ७
इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द येथील रहिवासी असणारे ३३ वर्षीय शिक्षक ५ ऑगस्टपासून बेपत्ता आहेत. अडसरे ता. इगतपुरी येथील माध्यमिक शाळेत ते शिक्षक म्हणून काम करतात. शाळेतून निनावी येथे संस्थाचालक यांच्यासोबत बैठक झाल्यावर घरी येतो असे सांगूनही ते परतले नाही. कुटुंबीयांनी शोध घेऊनही ते मिळून न आल्याने वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात हरवल्याची खबर दाखल करण्यात आली आहे. पत्नी मंगल चेतन फोकणे यांनी वाडीवऱ्हे पोलिसांत खबर दाखल केली.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, घोटी खुर्द येथील चेतन रुंजाजी फोकणे वय ३३ हे सर्वतिर्थ टाकेद माध्यमिक विद्यालय, अडसरे ता. इगतपुरी येथे शिक्षक म्हणून नोकरी करतात. ५ ऑगस्टला सकाळी साडेनऊच्या सुमारास नेहमीप्रमाणे चेतन फोकणे प्लॅटिना मोटरसायकल क्रमांक MH 15 GS 2509 घेऊन शाळेत ड्युटीवर गेले. दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास पत्नी मंगल यांना चेतन फोकणे यांनी फोन केला. त्यावेळी सांगितले की, आज शाळेतले कामकाज आटोपून मी निनावी येथील शाळेत संस्थाचालक झोले यांच्यासोबत मिटिंगसाठी आलो आहे. मात्र संध्याकाळ होऊनही ते घरी परतले नाही. यामुळे पत्नी मंगल फोकणे यांनी चेतन फोकणे यांना मोबाईलवर फोन करूनही फोन लागला नाही. पत्नी मंगल, वडील रुंजाजी, दिर महेश, भाऊ सागर, संतोष या सर्वांनी निनावी, अडसरे आणि परिसरात चेतन फोकणे यांचा शोध घेतला. मात्र ते सापडले नाहीत. यामुळे पत्नी मंगल फोकणे वय ३१ धंदा – घरकाम रा. घोटी खुर्द ता. इगतपुरी जि. नाशिक यांनी वाडीवऱ्हे पोलिसांत खबर दाखल केली आहे.
चेतन रुंजाजी फोकणे यांचे वर्णन असे आहे. त्यांचे वय ३३ असून उंची ५ फुट ८ इंच, रंगाने निमगोरा, केस बारीक, दाढी वाढलेली, अंगात क्रीम कलरचा शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट, सोबत बजाज कंपनीची प्लॅटीना गाडी क्रमांक MH 15 GS 2509 आहे. ह्या वर्णनाबाबत अथवा ह्या प्रकरणाबाबत कोणाला काहीही माहीत असल्यास वाडीवऱ्हे पोलीस ठाणे अथवा नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देविदास फड आणि सहकारी यांनी पुढील तपास सुरू केला आहे.