इगतपुरीत परगावच्या मतदारांवर उमेदवारांची भिस्त ; मतदार नाही राहिले स्वस्त

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – १० प्रभाग असणाऱ्या इगतपुरी नगरपरिषदेच्या २१ नगरसेवकांसह थेट नगराध्यक्षांचे भवितव्य ठरवणाऱ्या एका एका मतांची किंमत राजकीय पक्षांनी ओळखली आहे. काहीही चमत्कार होऊ शकतो हे गृहीत धरून मतदारांनी आपल्याच पक्षांना मतदान करावे यासाठी उमेदवारांनी क्लुप्त्या लढवणे सुरू केले आहे. ह्यातच रेल्वे, कारखाने, हॉटेलिंग आदींच्या निमित्ताने अनेक इगतपुरीकर बनलेल्या नागरिकांची बदली झाली आहे. किंवा मूळ इगतपुरीकर असलेल्या पण नोकरीनिमित्त परगावी असलेल्या मतदारांचा शोध सुरू आहे. त्यातच विवाहामुळे परगावी गेलेल्या विवाहित महिलांना शोधले जाते आहे. २ डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीच्या मतदार यादीत अशा सर्व मतदारांचे नाव समाविष्ट असल्याने संबंधिताने आपल्यालाच मतदान करावे ह्यासाठी त्याच्या संपर्कासाठी पक्षांची यंत्रणा “भरारी” घेऊ लागली आहे. परगावच्या मतदारांना जो कोणी मतदानाला ‘ येनकेन’ प्रकारे घेऊन येतो त्याच्याच पारड्यात मतदान पडत असते. ह्या मतांनी विजयासाठी निर्णायक फायदा होतो. या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रभागातील परगावी राहणाऱ्या मतदारांची यादी, संपर्क क्रमांक, अपेक्षा, अपेक्षित खर्च, आणणारा कार्यकर्ता अशा मुद्यांवर यादी बनवणे अंतिम टप्प्यात आले आहे. इगतपुरीत राहूनही कधी नमस्कार न केलेल्या उमेदवारांकडून निवडणुकीच्या निमित्ताने आर्जव, विनंत्या पाहून परगावी राहणारे मतदार नखरे करू लागले आहेत. दुसऱ्याला शब्द देऊन बसलो, दुसरा कालच घरी आला होता, मतदानाला आलो तर बिनपगारी रजा टाकावी लागेल, ‘नियोजनाचे काय’, मागील वेळी चहावरच धकवले, अशी अनेक कारणे काढली जात आहेत. परिणामी उमेदवारांचा मानसिक थकवा वाढतोय. परगावच्या उमेदवारांच्या एका घरातील किमान ५ मतदान असते. यासाठी किमान १० हजारांचा ‘भाव’ खाण्यात येत आहे. उमेदवार जितका बिलंदर तितकेच परगावचे मतदार बिलंदर असल्याने त्यांना हाताळण्यासाठी विशेष व्यक्तीची निवड करण्यात आलेली आहे.

error: Content is protected !!