२०२४ मध्ये जगद्‌गुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठगमन सोहळ्याचे भरवस येथे आयोजन : नाशिक जिल्ह्यातील पहिल्याच भव्य कार्यक्रमाचे नियोजन सुरु

चंद्रकांत जगदाळे : इगतपुरीनामा न्यूज – श्री तुकाराम बीज हा दिवस संत तुकोबारायांचा सदेह वैकुंठ गमनाचा दिवस आहे. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकोबारायांनी वैकुंठगमन केले. त्यांस २०२४ -२५ दरम्यान ३७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने निफाड तालुक्यातील भरवस फाटा येथे २ ते ८ एप्रिल २०२४ या कालावधीत जगद्‌गुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठगमन सोहळा रंगणार आहे. यासंबंधीची नियोजन बैठक हभप. ज्ञानेश्वर माऊली कदम ( छोटे माऊली ) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या बैठकीस जिल्हाभरातील वारकरी संप्रदायातील लोक उपस्थित होते. पुढील वर्षी या सोहळ्यास लाखोंच्या संख्येने वारकरी उपस्थित राहणार असल्याने आतापासूनच या सोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. भरवस फाटा येथे होणाऱ्या सोहळ्यात निफाड, येवला, चांदवड, सिन्नर, कोपरगाव या पाच तालुक्यांतील नागरिकांनी पुढाकार घेतलेला आहे. महाराष्ट्रभरातील वारकरी, कीर्तनकार, प्रवचनकार, आणि भजनी मंडळींसह एक लाखांपेक्षा जास्त उपस्थिती राहण्याचा अंदाज आहे. या सोहळ्यात अखंड हरिनाम सप्ताह, श्री तुकोबाराय जीवन चरित्र कथा व पाच हजार गाथा वाचकांचे संगीत गाथा पारायण होणार आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये आजपर्यंत इतका भव्य कार्यक्रम झाला नसून कार्यक्रम आयोजनाची ही पहिलीच वेळ आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्रीक्षेत्र देहू येथून पायी ज्योत आणण्याचे नियोजन आहे. आद्यशंकराचार्य स्थापित चार धर्मपीठातील जगद्गुरुंना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात येणार आहे. जगद्‌गुरु तुकोबारायांच्या पादुका निफाड, येवला, चांदवड, सिन्नर, कोपरगाव या पाच तालुक्यांतुन हेलिकॉप्टरने भ्रमण करून कार्यक्रमस्थळी आठ दिवस दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. तुकोबारायांचे वंशज देहूकर महाराज यांच्यासह सर्व संतांचे वंशज, संस्थानांचे पदाधिकारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, केंद्रीय मंत्री, आदी राजकीय नेत्यांची उपस्थिती या सोहळ्यास राहणार आहे. २०२४ मध्ये २ ते ८ एप्रिल या कालावधीत संपन्न होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या काळात नाशिक जिल्ह्याअंतर्गत १५ तालुक्यांतून प्रत्येकी एक आदर्श कीर्तनकारास ‘धन्य तुकोबा समर्थ’ हा मानाचा पुरस्कार सोहळ्याच्या वतीने व श्री तुकोबारायांच्या वंशजांच्या हस्ते दिला जाणार आहे.

मोठ्या संख्येने वारकऱ्यांची उपस्थिती राहण्याचा अंदाज असल्याने सप्ताहातील आजूबाजूच्या तालुक्यातील गावातील  नागरीकांच्या सहकार्याने दैनंदिन पंगतीचे नियोजन ठरविण्यात आले आहे. व्यसनमुक्त होऊ पाहणाऱ्या लोकांना दारूबंदी, आणि व्यसनमुक्तीची शपथ देऊन भगवंत कार्यात सहभागी करून घेण्यात येणार आहे. बैठकीला सर्वश्री. तुकाराम म. परसुलकर, ज्ञानेश्वर म. शिंदे (रुई), बाळासाहेब म.वाघचौरे, समाधान म. पगार, जनेश्वर महाराज (भारतमाता आश्रम), मधुकर म. गडाख, ज्ञानेश्वर म. ठाकरे, श्याम म. गाडे, निलेश म. निकम, सयाजी म. बोंबले, रामदास म. जाधव, बाळनाथ म. देवढे, संतोष म. पोटे, ऋषिकेश म. कुयटे, दत्तु काका राऊत, विठ्ठल अण्णा शेलार, हरिश्चंद्र अप्पा भवर, शिवाजी काका जगताप, माणिक म. शेळके, गोरख आबा पवार, संपत ढोमसे, सोपान गायकर, नामदेव रेंढे, पप्पू शिंदे, निवृत्ती जगताप, माधव जगताप, जनार्दन गीते आदींसह वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!