
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – आदिवासी आणि सामान्य माणसाचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. कोट्यवधी रुपयांचा खर्च यासाठी सातत्याने केला जातो. इगतपुरी तालुक्यातील खंबाळे गटातही अनेक शासकीय योजना राबवल्या गेल्या. दुर्दैवाने हे सगळं फक्त कागदावर दिसत आहे. मागे वळून पहातांना प्रस्थापित लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांनी खंबाळे गटाला पिछाडीवर नेवून ठेवल्याचे विदारक चित्र आहे. तरुणाईच्या हाताला काम नाही. मजुरांना रोजगारासाठी स्थलांतर करणे भाग पडते. शेतकऱ्यांना कोणी वाली नाही. एकतर्फी सत्ता असल्याने भ्रष्टाचारावर कोणाचा अंकुश नाही. युवकांमध्ये व्यसनाधिनता वाढवली गेली आहे. उच्चशिक्षणासाठी सुविधा नाहीत. हे संपूर्ण चित्र बदलावे म्हणून युवकांनी आपल्या हातात सत्ता घ्यायला हवी. म्हणूनच आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत खंबाळे गटातून निवडणूक लढवायचा आणि जिंकण्याचा निश्चय केला आहे अशी माहिती जगन्नाथ रामदास ठोंबरे या उदयोन्मुख युवकाने दिली. गावागावात निरंतर विकास साधण्यासाठी तन मन धनाने प्रामाणिक कार्य करण्याचा संकल्प आहे. यासाठी युवावर्गानेही आपला हक्काचा उच्चशिक्षित उमेदवार म्हणून जगन्नाथ ठोंबरे यांना पहिली पसंती दिली आहे.
खंबाळे गटातून उमेदवारी करणार असलेला जगन्नाथ रामदास ठोंबरे हा युवक आदिवासी ठाकूर समाजाचा आहे. त्यामुळे प्रत्येक आदिवासी जमाती आणि अन्य जातीधर्माच्या लोकांच्या प्रश्नांची त्यांना संवेदना आहे. शिक्षण DMLT ( लॕब टेक्निशयन ) झालेले असून ते सिद्धीविनायक क्लिनिकल लॕब चालवतात. त्याद्वारे त्यांचा तळागाळातील लोकांशी अतिशय जवळून संबंध आहे. सामाजिक चळवळीत आणि समाजोपयोगी कार्यात गेल्या १५ वर्षापासून सक्रियतेने त्यांचा सहभाग आहे. शासकीय योजनांचा पाठपुरावा करून शेकडो गरजु लोकांना त्यांनी लाभ मिळवुन दिला आहे. अनेक वर्षांपासून प्रत्येक दिवाळीत गोरगरिबांना मिठाई आणि कपडे वाटपाचा त्यांचा उपक्रम असतो. इगतपुरी तालुक्यातील गावागावातील युवकांसह अनेकांशी त्यांचा खूप मोठा जनसंपर्क आहे. आरोग्याची समर्थ व्यवस्था, तरुणांना रोजगार, शेतीला पाणी आणि कृषि विभागाच्या योजना, उत्तम अंगणवाड्या, स्वयंरोजगारासाठी प्राधान्य, शुद्ध आणि पारदर्शक राजकारण, सक्षम गाव सक्षम ग्रामपंचायत असे अनेकानेक उपक्रम यशस्वी करण्यासाठी खंबाळे गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येईल असा विश्वास जगन्नाथ ठोंबरे यांनी शेवटी व्यक्त केला.