
इगतपुरीनामा न्यूज – पावसाच्या माहेरघरीच पाण्याची टंचाई जाणवत असल्याचे चित्र समोर आले आहे. इगतपुरी शहरातील शिवाजी नगर, पंढरपूर वाडी, सह्याद्रीनगर येथील रहिवाशांना गेल्या दहा ते बारा दिवसांपासून भावली धरणातुन येणारी पाणीपुरवठा योजनेची नवीन पाईप लाईन फुटल्याने पाणीपुरवठा होत नाही. नगरपरिषद प्रशासनाला वारंवार सांगूनही पाणीपुरवठा होत नसल्याने येथील नागरिकांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी चक्क टँकर मागविण्याची वेळ आली आहे. शेवटी येथील संतापलेल्या रहिवाशांनी थेट आदिवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष दि. ना. उघाडे यांच्या नेतृत्वाखाली नरपरिषद कार्यालय गाठत नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांना बाहेर काढत नगरपरिषद बंद केली. नगरपालिकेच्या मुख्य गेट समोर ठिय्या मांडून आंदोलन केले. जोपर्यंत पाणी येत नाही तो पर्यंत हटणार नसल्याचा पवित्रा नागरिकांनी घेतला. मुख्याधिकारी कार्यालयात हजर राहत नसल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला. परिस्थिती लक्षात घेत इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी मध्यस्थी करून मुख्याधिकारी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. आज कुठल्याही परिस्थितीत ४ वाजेपर्यंत पाणी येईल असे सांगत आंदोलकांची समजूत काढत ठिय्या मागे घेण्याचे आवाहन केले. आंदोलकांनीही त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आंदोलन स्थगित केले. यामुळे नगरपरिषद परिसरात एकच गोंधळ उडाला होता. जर आज पाणी आले नाही तर उद्या परत नगर परिषद कार्यालय बंद करण्याचा इशारा देत आंदोलन कर्ते माघारी फिरले.