
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्षपदासह २१ सदस्यांसाठी आजपासून निवडणूक अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. १७ नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. या पार्श्वभूमीवर पॅनल निश्चिती, उमेदवार निश्चित करण्यासाठी राजकीय नेत्यांच्या बैठकांचा धडाका सुरू आहे. इतर पक्षांतील नेते, कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेश सुरू होणार आहेत. आजपासून आरोप-प्रत्यारोपांचा धडाका सुरू होणार असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. एकमेकांविरोधात कट्टर असलेले एकत्र येत आहेत, तर एकत्रित असलेले फुटून दुसऱ्या पक्षात जात आहेत. अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यानंतर चुरस आणखी वाढणार आहे. इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर हे काम पाहणार आहेत. कायदा सुव्यवस्था जपण्यासाठी इगतपुरीच्या पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव आणि त्यांचे संपूर्ण पथक कार्यरत झालेले आहे.