खंबाळे गटाच्या कायापालटासाठी १५ वर्षांपासून झपाटलेला युवक राहुल बोंबले : लोकप्रिय आणि कार्यतत्पर व्यक्तिमत्व राहुल बोंबले खंबाळे गटातून करणार उमेदवारी 

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – काही व्यक्तिमत्व लोकसेवेच्या समर्पित कार्यासाठी अखंडतेने कार्यरत असतात. जिथं जिथं गरज पडेल तिथं त्यांना चांगले काम करण्याचा छंद जडलेला असतो. मोडाळे ता. इगतपुरी येथील राहुल राधाकिसन बोंबले हा गोव्यातून पदवीधर झालेला युवक म्हणजे लोकसेवेसाठी समर्पित व्यक्तिमत्व म्हणून इगतपुरी तालुक्यात सुप्रसिद्ध आहे. गावात स्वच्छता करण्यासाठी स्वतः झाडू हातात घेऊन गावाला पुढे नेणाऱ्या ह्या युवकाला समाजसेवेचा स्वतःचा १५ वर्षांचा अनुभव आहे. या काळात मोडाळे गावासह परिसराचा अभिमान बनलेले कार्य अतिशय प्रेरक म्हणावे लागेल. आगामी जिल्हा परिषद सदस्य निवडणुकीसाठी खंबाळे गटातून राहुल बोंबले हे उमेदवारी करणार आहेत. आजोबा आणि आई-वडिलांच्या शिकवणीतून त्याच्या जडणघडणीत रुजलेली त्रिसूत्री म्हणजे मेहनत, प्रामाणिकपणा आणि निर्मळ समाजसेवा. मोडाळे गावाला देशाच्या नकाशावर आणण्यासाठी राहुल बोंबले यांच्यासह त्यांच्या परिवाराचा सिंहाचा वाटा आहे. अशा लोकप्रिय आणि कार्यतत्पर युवकाला खंबाळे गटातून निश्चितच भरघोस मतांनी जिल्हा परिषदेत पाठवले जाईल एवढं त्याचं कार्य सर्वोत्तम आहे. खंबाळे गटाला आता नुसते आश्वासन देण्यापेक्षा काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे.  कृतीतून परिवर्तन घडवून दाखवण्यासाठी राहुल बोंबले यांची उमेदवारी असणार आहे. गटातील मतदारांच्या पाठिंब्याची, मार्गदर्शनाची आणि सक्रिय सहभागाची गरज आहे. आत्तापर्यंत जे काम लोकसहभागातून आणि यंत्रणेबाहेर राहून केलं, तेच आता यंत्रणेमध्ये जाऊन प्रभावीपणे करायचं आहे. खंबाळे गटाचा कायापालट करायचा आहे असे राहुल बोंबले म्हणाले. एका सामान्य माणसाने ठरवलं तर बदल घडवू शकतो, हे आपण एकत्र सिद्ध करण्यासाठी सदृढ, सशक्त आणि प्रगत समाजनिर्मितीसाठी राहुल बोंबले सरसावले आहेत.

राहुल राधाकिसन बोंबले यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सर्वप्रथम खंबाळे गटातील प्रिय मतदार बंधू-भगिनींना कळकळीची विनंती केली. माझ्याकडे खोटी आश्वासने नाहीत, स्वार्थासाठी मखलाशी नाही, स्वतःविषयी गर्विष्ठ विधानं नाहीत आणि मतांचा जोगवा मागण्याची लाचारीही नाही. माझ्या कर्तृत्वावर प्रेम करणाऱ्या आपल्यासारख्या सर्व प्रियजनांना निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारी करून मनापासून कौल लावणार आहे. आजोबा आजोबा कै. लक्ष्मण कृष्णाजी बोंबले हे तीनदा जिल्हा परिषद सदस्य राहिले. १९४५ च्या भात लढा आंदोलनात त्यांनी तालुक्याचे पहिले आमदार कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने यांच्या सोबत त्यांनी सर्वसामान्यांसाठी निस्वार्थपणे कार्य केलं. त्यांची ओळख म्हणजेच जनतेसाठी झटणारा नेता. वडील राधाकिसन लक्ष्मणराव बोंबले हे आदिवासी महामंडळामध्ये कार्यरत असताना समाजातील तळागाळातील लोकांना खावटी वाटप, मोटार पंप वाटप अशा योजनांचा लाभ मिळवून देऊन नेहमीच उपेक्षितांना प्रवाहात आणण्याचे काम केलं. आई सौ. मंगला राधाकिसन बोंबले ह्या मोडाळे गावाच्या यशस्वी सरपंच राहिल्या. त्यांच्या कारकीर्दीत विकासपुरुष गोरख बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गावाला राज्य आणि केंद्र शासनाचे पुरस्कार मिळाले. ह्या इतिहासाची प्रेरणा घेऊन राहुल बोंबले यांचे कार्य निरंतर सुरु आहे. गेली १५ वर्षे सर्व जाती-धर्मातील वंचित, उपेक्षित, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी ते कार्यरत आहेत. इगतपुरी तालुक्यातील नागरिकांनी राहुलचे काम आणि प्रामाणिक प्रयत्न प्रत्यक्ष अनुभवले आहेत.

आदिवासी समाजासाठी खावटी वाटप योजना, स्वाधार योजना, CMEGP / PMEGP योजना, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शासकीय वस्तीगृह योजना, छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार योजना, परदेशात विशेष अध्ययनासाठी योजना, गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल – उपजीविकेचा आधार, वसंतराव नाईक महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ, महाज्योती विभाग, एकल पालक योजना, लाडकी बहीण योजना, अपंग कल्याण योजना, वृद्धांसाठी वयोश्री योजना,  इगतपुरीतील ज्येष्ठांसाठी – अयोध्या तीर्थदर्शन योजनेचा पवित्र लाभ, संजय गांधी, वृध्दापकाळ, निराधार पेन्शन योजना – या सर्व योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवला. इगतपुरी तालुक्यातील ९ ते १८ वर्षे वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या कॅन्सरवरील लस देण्यात आली. अण्णासाहेब पाटील कर्ज योजना आणि विद्यार्थ्यांसाठी जात पडताळणीसाठी मार्गदर्शन, महिलांना बचत गट व सरकारी योजनांचा लाभ मिळावा म्हणून त्यांची खाती स्टेट बँक ऑफ इंडियात उघडून दिली. गावकरी व युवक मंडळांच्या मदतीने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी शिधापत्रिका मिळवून देणे, आदिवासी विकास महामंडळ, शबरी महामंडळ, पंचायत समिती, समाजकल्याण विभागाच्या योजनांची जनजागृती आदी कामे राहुल बोंबले यांनी केली आहेत. मी शेतकऱ्यांचा मुलगा असून शिक्षणाने घडलेला आणि अनुभवाने तयार झालेले नेतृत्व मी दाखवणार आहे.आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि ग्रामविकास या चार आधारस्तंभांवर खंबाळे गटाचं भविष्य उभं करण्याचा माझा निर्धार असल्याचे आहे. माझं मिशन स्पष्ट आहे, “गावागावात विकास, प्रत्येक घरात विश्वास!” चला, एकत्र येऊया आणि आपला खंबाळे गट आदर्श गट बनवूया असे राहुल बोंबले शेवटी म्हणाले.

error: Content is protected !!