सावधान.. तयारी करुया तिसऱ्या लाटेची

कोरोनाच्या प्रारंभीच्या अवस्थेसह आजपर्यंतच्या परिस्थितीचा आढावा घेऊन मनमोकळ्या शब्दांमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा कसा सामना करावा याबाबत उपयुक्त मार्गदर्शन करताहेत डॉ. संजय दामू जाधव ( MBBS, MS Ortho )

लेखक : डॉ. संजय दामू जाधव ( MBBS, MS Ortho )
अस्थिव्यंगोपचार विभागप्रमुख
SMBT महाविद्यालय, धामणगाव, जि. नाशिक
ऑर्थोपेडिक सर्जन, जे अँड जे हॉस्पिटल, नाशिक

कोरोनाच्या महामारीचे आजचे स्वरूप भयंकर आहे. या आजाराची ओळख होण्यास खूप शक्ती आणि वेळ वाया गेली. तरीही तेव्हा आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि प्रत्यक्ष उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी त्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावून बऱ्याच प्रमाणात या महामारीला नियंत्रणात ठेवले होते. आरोग्य सेवक चांगल्या प्रकारे समाजाची सेवा करत होते. मात्र समाजाचे चित्र विदारक होते. त्या काळात नर्सेस, डॉक्टर यांना समाजाने वाळीत टाकले होते. कुठे सत्कार तर कुठे सोसायटीत  बंदी असा विदारक अनुभव आला. पहिल्या वेळेस निकृष्ट दर्जाचे पीपीई, मास्क, त्याचा तुटवडा व त्यांच्या भरमसाठ किंमती त्यामुळे ही उपचार महागडे होते.
दिलासादायक गोष्ट म्हणजे ग्रामीण भाग या महामारीच्या पहिल्या लाटेपासून दूर होता. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था आणि जनजीवन जास्त विस्कळीत झालेले नव्हते. सामाजिक व कौटुंबिक कार्यक्रम सुरू होते. ग्रामीण भागात मुक्त संचार सुरू होता. पहिल्या लाटेत देशव्यापी लाॅकडाऊन कुठलीही पूर्वतयारी व पूर्वसूचना न देता करण्यात आला. परप्रांतीय मजूर दुसऱ्या राज्यांमध्ये अडकून पडले. शिवाय कुठलीच तारीख ही परिस्थिती बदलण्यासाठी नव्हती. सर्व दळणवळण साधने बंद होती. काही लोक रेल्वे शेजारून जात असताना त्यावर तेथेच झोपले आणि त्यांचा मृत्यू झाला. अनेक लोक पायी जाताना उपासमारीने मेले. बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांनी त्यांच्या सीमा बंद केल्या. शिवाय या राज्यातील लोकांनी परप्रांतात गेलेल्या आपलाच बांधवांना गावबंदी केली. अभूतपूर्व असा गोंधळ निर्माण झाला आणि लोकांच्या उपासमारीने बळी गेले. बिहारमध्ये तर मुंबईचा माणूस घरी आल्याची बातमी दिली म्हणून खून सुद्धा पडले.
दुसरी लाट ही पूर्वीपेक्षाही भयंकर रूप घेऊन आली. वर्षभर मोठ्या प्रमाणात रोजगार गेल्याने उपासमार सुरू होती. शाळा आणि महाविद्यालय आता हळूहळू उघडत होती आणि तशातच नवे स्वरूप घेऊन महामारी आली.  लोक आता जगण्याची लढाई लढण्यास शिकत होते. जगणे किंवा जगविणे अतिमहत्त्वाचे होऊन बसले होते. यासाठी लोक आपल्या सेवेच्या व्यवसायाच्या ठिकाणी हजर झाले होते. उद्योगाचीही आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक झाल्याने उद्योजकांनी आपले व्यवसाय, कंपनी सुरू केली होती. त्यातून लोक मुक्तसंचार करत होते आणि त्यांचा एकमेकांशी येणारा संपर्क यातून संसर्ग वाढत होता. सरकार ‘मिशन बिगीन अगेन’ पुन्हा एकदा सुरुवात, ‘ या नावाखाली काही गोष्टी उघडू पाहत होते. कामगार दुसर्‍या राज्यातून परराज्यातून परत कामाच्या ठिकाणी येत होते. त्यातूनच आरोग्य खात्यात पूर्वी कंत्राटी कामगार होते त्यांनाही घरी पाठवण्यात आले. तीन महिने त्यांनी केलेल्या कामाचा त्यांना मोबदला देण्यात आला नाही. त्यातून मोठा असंतोष निर्माण झाला. ठिकठिकाणी लोकांनी आंदोलने केली. परंतु सरकारने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. काहींनी तर उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यात कामगारांना कायदे बदलून आता कामाची वेळच बारा-बारा तास करण्यात येईल अशा प्रकारच्या भूमिका घेतल्या. त्याचा परिणाम म्हणून कामगार देशोधडीला लागला तर मोठ्या कंपन्यांनी नवीन भूमिका घेतली. निवृत्ती अथवा स्वेच्छेने निवृत्ती स्वीकारा आणि लवकर काम सोडून द्या. नवे कंत्राटी कामगार भरण्याला सुरुवात झाली आणि त्यातून कामगार क्षेत्रात अराजकता वाढली.
दुसऱ्या लाटेचे वैशिष्ट्ये म्हणजे ही लाट विषाणूंचा नवा प्रकार घेऊन आली. विषाणूमध्ये बदल झाला. माणसाला बाधित करण्याचा वेग सुद्धा वाढला होता आणि त्याची तीव्रता सुद्धा वाढली होती. या लाटेपूर्वी आरोग्य सेवक, फ्रन्टलाइन वर्कर आणि काही जेष्ठ नागरिक यांच्यासाठी लसीचे संरक्षण आले होते. पाच राज्यांचे निवडणुकीचे वारे वाहू लागले होते. सत्ताधारी आपला विस्तार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे ठिकठिकाणी सभा, संमेलने आणि मिरवणुका काढत होते. तर विरोधक काही ठिकाणी सत्ता टिकविण्यासाठी आणि काही ठिकाणी सत्ता नव्याने प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशिल होते. मात्र या काळात त्यांना जगात असलेल्या महामारीचा विसरच पडला होता असे लक्षात येते. पूर्वीपेक्षा आता प्रसार आणि प्रसार शंभर पटीने वाढला होता. गंभीर होणाऱ्यांची संख्या यावेळेस जवळजवळ दोनशे पटीने वाढली. शेकडो कुटुंबे संसर्गित झाली, घरातील कर्ते कमावती माणसे जे 31 ते 50 वयोगटातील आहे त्या लोकांनाही आजाराने गाठले गंभीर  स्वरूपापर्यंत नेले.
सुरुवातीला लसीकरणाची योग्य उपयुक्तता आणि तिची गरज समजावण्यात आरोग्य विभाग आणि प्रचार आणि प्रसार माध्यम कमी पडले. शेवटच्या टप्प्यात लसीकरणाचा वेग वाढण्याबरोबरच लसीची कमतरताही निर्माण झाली. मोफत लसीकरण काही काळ चालले. परंतु नंतर अगदी आरोग्य सेवकांना सुद्धा लसीकरण विकत घेऊन करावे लागले आणि त्याचा गोंधळ उडाला. मध्यम तीव्र स्वरूपातील आजारातील लोक त्यांना ऑक्सिजनची मोठी गरज असतानाही ते पुरवू शकलो नाही. त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला ही गोष्ट पहिल्या लाटेत कधी विचारातच घेतली नाही.
आरोग्य यंत्रणेवर उद्योजकांवर औद्योगीकरणावर आणि त्यांच्या दळणवळणाच्या साधनावर मोठा ताण निर्माण झाला. ऑक्सीजन बेड जीवन सुरक्षा यंत्रणा वेंटिलेटर त्याचा अभूतपूर्व असा तुटवडा निर्माण झाला. केंद्रात सत्ताधारी असलेल्या पक्षाने आपल्या पक्षाची सत्ता असलेल्या ठिकाणी चाचण्या केल्या नाही. परिणामी मोठ्या प्रमाणात संशयित असलेले, लक्षण नसलेले, केवळ प्राथमिक लक्षणे असलेले हे सुपर स्प्रेडर झाले. नव्याने होणाऱ्या हेल्थ वर्कर भरतीसाठी आता लोक पुढे येईनासे झाले. कारण पूर्वानुभव चांगला नव्हता व मानधन किंवा पगार सरकारने त्यांना अद्याप दिले नव्हते. त्यामुळे प्रश्न उभे राहिलेले आहे. त्यातच हॅप्पी हायपाॅक्सिया म्हणजे शरीरातील प्राणवायूचे प्रमाण कमी असून सुद्धा ते तरुणांना न समजल्याने अचानक भोवळ येऊन ( मेंदूचा ऑक्सिजन पुरवठा कमी होऊन ) मृत्यूचे प्रमाण वाढले. नंतर तपासणी केल्यावर त्यांचा मृत्यू वा घरातील इतर सदस्य संसर्गित असताना व लक्षणे दिसले नाही त्यामुळे मृत्युपश्चात टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे दिसून आले. म्हणजेच कोरोनाने मृत्यू झाला हे पण सांगता येईल.
विषाणू आजार हा लक्षणानुसार उपचाराने बरा होतो. त्यामुळे जशी लक्षणे दिसतात त्यावर त्याप्रमाणे उपाय केला जातो. त्यामुळे त्याला असे कुठलेही निश्चित औषध नसते. अनेक औषधींचा प्रायोगिक तत्वावर उपयोग करण्यात आला. तो टॅमिफ्लू ,रॅबीफ्लू ,एचसीक्युएस यासारख्या आजारांचा मार्ग बदलणाऱ्या औषधांचा वापर वाढला. सांधेवातात वापरली जाणारी औषधे या विषाणूच्या वाढीचा वेग कमी करण्यासाठी वापरण्यात आली. रेमडेसिविर हे औषध मध्यम स्वरूपाच्या आजाराला चांगल्या प्रकारचे गुणकारी ठरू लागले. स्टीराॅईड औषधे ही संसर्गाचा सुरुवातीला व मध्यम स्वरूपाच्या आजारात गुणकारी असल्याचे लक्षात आले. काही डॉक्टरांनी केवळ स्टिरॉइड वापरून रुग्ण बरे केले. मात्र त्यामुळे आणखी नवीन समस्या निर्माण झाली. ती म्हणजे मधुमेह, किडनी, रक्ताचा मेंदूत रक्तस्राव होणे असे प्रकार वाढू लागले. रेमडेसिविर  विषाणू वाढीचा वेग कमी करणारे औषध  मध्यम स्वरूपाचा काही रुग्णांसाठी गुणकारी ठरले. म्हणून त्याचा वापर प्रमाणाबाहेर वाढला. स्टीराॅयडची  किंमत कमी होती. शिवाय ते नेहमीच्या वापरातील औषध होते. त्याचा वापर मागे पडला आणि आता रेमडेसिविर हाच काय तो दिलासा आहे असे लोक वागू लागले. नातेवाईक मग मिळेल त्या ठिकाणी मिळेल त्या पद्धतीने काळ्याबाजारात रेमडेसिविरची खरेदी करू लागलीत. हे भारतात बनत असले तरी त्यासाठी लागणारा कच्चामाल अमेरिका, चीन या देशातून मागवावा लागत होता. त्यामुळे त्याचा पुरवठा आणि त्याचे उत्पादन याचा मेळ घालता येईना. त्यातच मागणी वाढल्याने लोकांनी वेगळ्या प्रकारे आपल्या राजकीय, आर्थिक आणि इतर प्रसिद्धीसाठी म्हणून याचा उपयोग करण्याचे ठरवले. सत्ताधारी आणि विरोधक असे अनेक राज्यांमध्ये वेगवेगळे असल्याने त्या त्या ठिकाणी अभूतपूर्व असा गोंधळ निर्माण झाला.
रुग्णांसाठी खाटा नाही, ऑक्सिजन व आवश्यक औषधांचा तुटवडा, तपासणीसाठी लागणारा 72 तासांचा कालावधी आणि संपूर्ण कुटुंब संसर्गाला बळी पडणे यामुळे सर्व यंत्रणा हतबल झाली. ड्युटीवर असताना सहा तासांच्या ड्युटीत 120 पेशंट डॉक्टर बघू लागले. इच्छा असूनही एका रुग्णाला फक्त तीनच मिनिट एका ड्युटीत देता येऊ लागले. दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ दिवसभरातून एका रुग्णाला देता येतो. एकाच वेळेस अनेक रुग्ण अत्यवस्थ झाल्यास एकाकडे लक्ष दिल्यास दुसरा जगणार नाही आणि मग  त्याचे नातेवाईक आपणास शारीरिक इजा करतील या दडपणाखाली डॉक्टर मानसिक रुग्ण होऊ लागले आहे. डॉक्टर आपण रुग्णांना वेळ व योग्य उपचार देऊ शकत नाही व आपल्यासमोर रुग्ण ऑक्सिजन साठी तडफडून मरत आहे हे बघून दडपणाखाली आले. ते आपले जीवनही संपवू लागले. जगभरातून मदतीचा ओघ वाढला. मात्र ती मदत योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी समस्या निर्माण झाली.
लसीकरणाचा वेग मंदावला. लसीकरण ठप्प झाले. आज केवळ ०.८ % लोकांना लस मिळाली आहे. आता तर लस उपलब्ध नाही आणि आता तिसरी लाट येणार, तिसरी लाट आली आहे आणि तिसरी लाट लहान मुलांसाठी भयंकर ठरणार आहे. अशा प्रकारच्या आता बातम्या येऊन धडकल्या आहे. याच वेगाने आपण लसीकरण करू लागलो तर आपल्या देशात लसीकरण करण्यास किमान पंचवीस वर्षे लागतील.
तिसरी लाट कशी असेल यासाठी आपल्याला दोन तीन गोष्टी समजून घ्याव्या लागतील. आपल्या देशात असुरक्षित मुले आणि गर्भवती व स्तनदा माता महिला या लाटेचे भक्ष्य होण्याची शक्यता आहे. आरोग्य सेवकांचे लस घेऊन आता तीन ते चार महिने झाले आहे. सहा महिन्यानंतर बूस्टर डोसची गरज पडेल असे वैज्ञानिक सांगत आहे. ब्रिटनमध्ये आता बूस्टर डोस देण्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे. शिवाय अजून 18 ते 40 वयोगटातील तरुणांचे लसीकरणाचे दोन्ही डोस  बाकी आहे. 45 ते 60 या वयोगटातील लोकांना अजून दुसरा डोस मिळाला नाही आणि ज्यांना संसर्ग झाला होता त्यांचा पहिला डोस सुद्धा बाकी आहे. असा विचार करता आज भारतामध्ये किमान 99 टक्के लोक अजून लसीकरणापासून दूर आहे. केवळ एक टक्का लोकांचे संपूर्ण लसीकरण झालेले आहे केंद्र व राज्य सरकारअजून  काय करावे याच गोंधळात आहे.
अश्या परिस्थितीत आपल्याला ही लढाई लढण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल याची माहिती खालीलप्रमाणे
■ प्रत्येक गावात दहा पुरुष व दहा स्त्रियांसाठी ऑक्सिजन  बेड उघडावे लागतील.
■ प्रत्येक गावात वीस पुरुष व महिला यासाठी विलगीकरण कक्ष उभा करावा लागेल. त्यासाठी प्रत्येकात शौचालयाची निर्मिती करावी लागेल.
■ तो वार्ड वेगळ्या प्रकारे मॅनेज करण्यासाठी गावातच अशा प्रकारची व्यवस्था करावी लागेल.
■ प्रत्येक गावात एक परिचारिका दोन बहुउद्देशीय सेवक आरोग्य विभागाकडून देण्याचे करावे लागेल. त्यांची नेमणूक  कायमस्वरूपी करावी लागेल.
■ ज्या गावची लोकसंख्या दोन हजारच्या पटीत वाढेल तसे तसे परिचारिका आणि बहुउद्देशीय सेवा यांचीही संख्या वाढवाव्या लागतील.
■ माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक प्राथमिक या सर्वांना प्रशिक्षित करून या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून उभे करावे लागेल. रुग्णालयाची विलगीकरण कक्ष त्याच्या स्थापना आणि व्यवस्थापन महसूल विभागाला सोपवावे लागेल.
■ प्रत्येक पंचायत समिती सर्कल, निमशहरी भागात वार्ड तेथे ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र व शहरी भागात नागरी वैद्यकीय केंद्र उभे करावे लागेल.
■ एक फिरते पथक व एक स्थायी वैद्यकीय अधिकारी असे दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची या ठिकाणी व्यवस्था करावी लागेल.
■ प्रत्येक जिल्हा परिषद गटांमध्ये प्रत्येक नगरपालिकेत महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात एक ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभा करावा लागेल.
■ तालुक्याच्या सर्व रुग्णालयाची क्षमता वाढून ती शंभर खाटा इतके करावी लागेल. ज्यामध्ये 50% ऑक्सिजन आणि अत्यवस्थ रुग्णांसाठी व्हेंटिलेटरची सोयदेखील असेल.
■ महापालिका क्षेत्रात किमान 1000 खाटांचे रुग्णालय सुरु करावे लागेल. त्यामध्ये 50 टक्के ऑक्सीजन बेड आणि वेंटिलेटर असल्याची सोय करावी लागेल.
■ प्रत्येक रुग्णालयात किमान चार विषयतज्ज्ञ एमडी मेडिसिन किंवा चेस्ट फिजीशियन यांची नेमणूक करावी लागेल.
■ सर्व जिल्हा रुग्णालयांच्या अंतर्गत किमान शंभर मुलांचे प्रवेश क्षमता असलेले वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे लागेल.
■ ज्या शहराची लोकसंख्या दहा लाख आणि त्याच्या पटीत आहे. त्याचा विचार करून प्रत्येक दहा लाखामागे एक वैद्यकीय महाविद्यालय अशा प्रकारे महापालिकेमध्ये सोय करावी लागेल.
■ सर्व उपजिल्हा विभाग किंवा आपण प्रांत अधिकारी उपविभाग म्हणतो त्या ठिकाणी सरकारी परिचारिका महाविद्यालय उभे करावे लागेल.
■ सर्व आयुष, होमिओपॅथी, दंतचिकित्सा या विद्या शाखेतील द्वितीय वर्षाचे विद्यार्थी ते व्यावसायिक यांना या आपत्ती व्यवस्थापनात समाविष्ट करून घ्यावे लागेल.
■ सर्व महाविद्यालयांमध्ये 30 खाटांचे रुग्णालय सक्तीचे करण्यात यावे. यामुळे तेथील विद्यार्थी संसर्गित झाल्यास त्यांना त्याच ठिकाणी उपचार देता येईल यासाठी महाविद्यालयातील वस्तीगृहाच्या इमारती वापरण्यात याव्या.
■ लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत. यासाठी समाजकार्य महाविद्यालय गैरवैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी व परिचारिका यांचे सहाय्य घ्यावे.
तरच आपण तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सक्षमता धारण केली असे म्हणावे लागेल.

( लेखक डॉ. संजय दामू जाधव हे MBBS, MS Ortho आदींसह विविध वैद्यकीय क्षेत्रातील मानाचे शिक्षण झालेले तज्ञ सर्जन आहेत. अस्थिव्यंगोपचार विभाग प्रमुख म्हणून ते SMBT महाविद्यालय, धामणगाव, जि. नाशिक येथे कार्यरत आहेत. यासह प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन असून त्यांचे स्वतःचे म्हसरूळ नाशिक येथे जे अँड जे हॉस्पिटल आहे. )

Similar Posts

2 Comments

  1. avatar
    SIDDHARTH SAPKALE says:

    तिसऱ्या लाटेची भयानक परिस्थिती असेल. त्यासाठी आतातरी गावागावांमध्ये लस घेण्याचे प्रमाण वाढवलेच पाहीजे त्यासाठी ग्रामपंचायतीने शर्थीचे प्रयत्न करणे गरजेचे वाटते….. स्वयंसेवक म्हणुन शिक्षक या नात्याने कधीही तयार असु… तशी वेळ मात्र ग्रामस्थांवर येऊ नये…

Leave a Reply

error: Content is protected !!