व्यवसाय मार्गदर्शन भाग – १ : झेरॉक्स सेंटर

मार्गदर्शक : मधुकर घायदार
संपादक शिक्षक ध्येय, नाशिक
संपर्क : 9623237135

मी कोणता व्यवसाय करू ? असा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. परंतु आपल्या आसपास नजर फिरविली तर जी गोष्ट आपणास दिसते ती प्रत्येक गोष्ट एक व्यवसायच असते. पण एक व्यवसाय म्हणून आपण त्याकडे बघत नाही. ज्याची वृत्ती, प्रवृत्ती उद्योजकतेची असते त्याला मात्र प्रत्येक ठिकाणी व्यवसायच दिसतात. त्यांतील कोणताही व्यवसाय करण्यास तो तयार असतो.

आपल्याकडे भरपूर पैसा असावा. मनात येईल त्या सर्व गोष्टी एका झटक्यात खरेदी करता याव्यात. आयुष्य चैनीचे असावे असे कोणाला वाटत नाही ? पण यासाठी आवश्यक ती कौशल्ये आत्मसात करण्याची आणि मेहनत घेण्याची तयारी मात्र असायला हवी. उत्तम अर्थार्जन करून लवकरात लवकर आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी योग्य व्यवसायाची निवड करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. आज आपण झेरॉक्स सेंटर या व्यवसायाबाबत अधिक माहिती जाणून घेऊ.

कुठल्याही उच्च शिक्षणाची गरज नसलेला झेरॉक्स सेंटर हा व्यवसाय असून मात्र यात काही अंगभूत कौशल्य मात्र हवे. आपल्या आजूबाजूला नजर टाकली असता अनेक झेरॉक्स सेंटर आपण बघतो. फक्त झेरॉक्स – सत्यप्रत – काढून देणे एवढ्यावरच मर्यादित हा व्यवसाय नक्कीच नाही. विविध कागदपत्रांची झेरॉक्स काढून देण्याबरोबर यांसोबत संलग्न असणारे अनेक प्रकारची कामे या सेंटरवर करून चांगली कमाई करता येते.

ब्लॅक अँड व्हाईट झेरॉक्स प्रिंट्स एक ते दोन रुपये, कलर झेरॉक्स पाच ते दहा रुपये, स्पायरल बायडिंग वीस ते तीस रुपये, प्रोजेक्ट रिपोर्ट टायपिंग दहा ते वीस रुपये प्रती पान, प्रोजेक्ट रिपोर्ट बायडिंग एकशे पन्नास ते दोनशे रुपये, गोल्डन एम्बोलसिंग, स्कॅनिंग पाच ते दहा रुपये, लॅमिनेशन दहा ते वीस रुपये, रबरी शिक्के तयार करून देणे चाळीस ते पन्नास रुपये या खेरीज ड्रायव्हिंग लायसेन्स, आधार कार्ड, पॅनकार्ड यांची दुय्यम कलर प्रत तयार करणे, विविध प्रकारचे पेन, रिफील, गम बॉटल, स्टेपलर, स्टेपलर पिन, पंचिंग मशीन, कलर मार्कर पेन, फेव्ही क्विक, फेव्ही स्टिक, फेव्हीकॉल बॉटल, विविध आकाराच्या फाईल, फोल्डर, प्रोजेक्ट पेपर आदींची विक्री करून चांगली कमाई होऊ शकते.

युवकांनी नकारात्मकता सोडून, लोक काय म्हणतील याचा विचार न करता व्यवसायाला सुरुवात करणे गरजेचे आहे. बँका, शाळा, कॉलेज, न्यायालय, जिल्हाधिकारी, तहसील, जिल्हा परिषद कार्यालय तसेच इतर शासकीय कार्यालयाजवळ किंवा वर्दळीच्या ठिकाणी मुख्य रस्त्यालगत झेरॉक्स सेंटर सुरु करता येते. सुरुवातीस भाडे तत्त्वावर दुकान घेऊन या व्यवसायाचा श्रीगणेशा करता येतो.

झेरॉक्स कशी काढावी ? झेरॉक्स मशीनची देखभाल कशी करावी ? याबाबत प्रशिक्षण देणारा अभ्यासक्रम आजतरी अस्तित्वात नाही. दुसऱ्याच्या झेरॉक्स सेंटरवर काम करून अनुभव प्राप्त करणे हाच एकमेव मार्ग आहे. झेरॉक्स सेंटर या व्यवसायात झेरॉक्स मशीन देखभालीचा खर्च वर्षाला सुमारे तीन ते पाच हजार रुपये येतो. त्यामुळे युवकांनी झेरॉक्स मशीनची देखभाल स्वतः शिकून घेणे अधिक फायदेशीर ठरते. एक संगणक सेट दुकानात ठेऊन युवक स्कॅनिंग, फॅक्स, डीटीपी, डिझायनिंग आणि प्रिंटींग देखील करता येते. झेरॉक्स मशीनची किंमत कंपनी, दर्जा, स्पीड, गुणवत्तेवरून ठरते.

सुमारे तीन हजार ते सहा लाख रुपयांपर्यंत झेरॉक्स मशीन बाजारात उपलब्ध आहे. झेरॉक्स सेंटर सुरु करण्यासाठी सुमारे एक ते तीन लाख रुपये भांडवलाची आवश्यकता आहे. झेरॉक्स काढावयाचा कागदाचा रिम – पाचशे कागद – दोनशे ते दोनशे पन्नास रुपयांना उपलब्ध आहे. झेरॉक्स काढण्यासाठी लागणारा खर्च एक कागद पंचेचाळीस पैसे आणि टोनर, लाईट, मजुरी इतर खर्च वीस पैसे असे सुमारे पासस्ट पैसे खर्च येतो. एकंदरीतच वर उल्लेखलेल्या सर्व वस्तूंची विक्री पाहता या व्यवसायातून सुमारे पंधरा ते तीस हजार रुपये प्रती महिना कमाई होऊ शकते. जितके जास्त ग्राहक, तितका जास्त नफा हे साधे सूत्र या व्यवसायातही तंतोतंत लागू पडते.

युवकांच्या अंगी झेरॉक्स काढण्यासाठी लागणारे कौशल्य, विक्री कौशल्य, सर्जनशीलता, संवाद कौशल्य व प्रामाणिक सेवाभावी वृत्ती असेल तर ‘झेरॉक्स सेंटर’ या व्यवसायाचा विचार करायला हरकत नाही.

Similar Posts

इगतपुरीतील गिरणारे व गावठा “अवघड” क्षेत्रात अन रस्ते नसलेल्या अनेक वाड्या “सोप्या” क्षेत्रात ; नांदगाव सदोची १ शाळा अवघड आणि १ शाळा मात्र सोप्या क्षेत्रात : शिक्षण विभागाने लावलेल्या जावई शोधाचे तालुकाभरात हसे ; अजबगजब शोधामुळे ८५० शिक्षकांमध्ये संताप

जिजाऊ ब्रिगेडचे पहिले राज्यव्यापी ग्रामीण महाअधिवेशन रेकॉर्ड ब्रेक होणार – जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे : धुळे जिल्ह्यात पिंपळनेर येथे ४ आणि ५ जूनला होणाऱ्या अधिवेशनासाठी राज्यातील महिला येणार

Leave a Reply

error: Content is protected !!