अटी शर्ती न लावता अवकाळीबाधितांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी : राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पांडुरंग वारुंगसे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांकडे मागणी 

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात गेल्या ४ दिवसांपासून अवकाळी मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. सततच्या पावसामुळे अनेक गावांमध्ये भात शेती पाण्याखाली गेली असून, कापणीला आलेले भात पिक जमीनदोस्त झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण हंगामाचे कष्ट पाण्यात गेले असून, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड निराशा आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग वारुंगसे यांच्या नेतृत्वाखाली  तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाण्याचे प्रचंड प्रमाण साचले आहे. या परिस्थितीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट इगतपुरी तालुक्याच्या वतीने शेतकऱ्यांसह तहसिल कार्यालयात भेट देऊन तहसीलदार अभिजित बारवकर यांच्याकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा मांडली. यावेळी शेतकऱ्यांना कुठल्याही अटी-शर्ती न लावता तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. पांडुरंग वारुंगसे यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांना आजच मदतीची गरज आहे. सरकारी यंत्रणा नुकसानाचे तातडीने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत द्यावी. तहसीलदारांनी याबाबत तातडीने योग्य ती कार्यवाही केली जाईल असे सांगितले.

error: Content is protected !!