खांदेपालट करून इगतपुरीत सत्ता परिवर्तन करण्यासाठी व्युव्हरचना सुरु : मतांचे विभाजन आणि बंडाळ्या ठरणार सत्तेचा “की फॅक्टर”

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरीच्या आगामी नगरपालिका निवडणुकीचा धुरळा घोषित होण्याची उत्सुकता वाढली आहे. इगतपुरी नगरपालिकेच्या २१ जागांसाठी निवडणूक होणार असून थेट नगराध्यक्ष पद ओबीसी प्रवर्गाच्या महिलेसाठी राखीव आहे. आजी माजी नगरसेवक रिंगणात उतरण्याची तयारी करून बसले आहेत. गेल्या ३० वर्षांपासून इगतपुरीकरांनी अखंड शिवसेनेच्या हातात नगरपालिकेची एकहाती सत्ता दिलेली आहे. आता दोन शिवसेना अस्तित्वात असल्याने मतांचे विभाजन होणार का याचीही सर्वांना आतुरता आहे. भाजपा, दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, इंदिरा काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, मनसे, रिपाइं आदी राजकीय पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील अशी दाट शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर फेकलेल्या बहुजन विकास आघाडीच यंदा प्रयोग होईल असे वाटत नाही. मुंबई, पुणे, नाशिक असा सुवर्णत्रिकोन साधणाऱ्या इगतपुरी शहरातील नगरपालिका ब्रिटिशकालीन आहे. विविध जातीधर्माचे प्राबल्य असणाऱ्या ह्या शहरात प्रत्येक प्रभागाच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांनी सूक्ष्म नियोजन केले आहे. यासाठी प्रत्येक पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरु केली असून गुप्त बैठका घेऊन खलबते केली जात आहेत. 

वर्षानुवर्ष होऊनही इगतपुरीत विकासाचा काहीच तपास नसल्याने सामान्य नागरिक हवालदिल आहेत. निवडणुका आल्यावरच लोकांच्या सेवेत दाखल होण्याचे सोंग करणारे प्रस्थापित नेते पायउतार करून नव्या कारभाऱ्यांना एक संधी द्यायला पाहिजे, अशी विचारधारा इगतपुरीत सुरु आहे. जनतेची निरंतर कामे करणाऱ्या युवकांच्या हातात एकदा सत्ता देण्यासाठी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. तथापि उघडपणे खांदेपालट करण्यासाठी कोणी पुढे येत नाही. म्हणून यासाठी जागरूक नागरिकांनी “बाहेरून शह अन आतून तह” अशी भूमिका घेऊन सत्ता परिवर्तन करण्यासाठी योजना तयार केल्याची चर्चा आहे. गत निवडणुकीत दुबळ्या असणाऱ्या भाजपकडून यंदा निवडणूकीसाठी प्रचंड प्रतिष्ठा पणाला लावली जाणार आहे. सर्व राजकीय पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवल्यास होणारे मतविभाजन कोणाच्या मुळावर घाला घालते याकडे विशेष लक्ष आहे. निवडणुकीची घोषणा होताच उमेदवार निश्चित केले जातील. ज्यांना संधी मिळाली नाही असे बंडोबा मतांचे विभाजन घडवण्यास पुढे असणार आहेत. मतांमध्ये फूट पाडण्यासाठी युक्त्याप्रयुक्त्या वापरल्या जातील. मत विभाजनाचे अनेक प्रकार घडल्यास इगतपुरी नगरपालिकेवर परिवर्तन अटळ मानले जात आहे. इगतपुरी शहराचा सक्षमतेने विकास घडवणारे, लोकांच्या समस्यांची जाण असणारे, जनसामान्य लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे उमेदवार यंदा निवडणुकीत उतरणार आहेत. बदलत्या काळानुसार विजयासाठी सर्वांनी काटेकोर नियोजन केले आहे. ह्यावेळी इगतपुरी नगरपालिकेवर परिवर्तन करण्यासाठी सामान्य मतदार राजा कोणाला साथ देईल यावर इगतपुरीचे भविष्य ठरणार आहे. 

error: Content is protected !!