संभाव्य समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा : आमदार खोसकर

वाल्मिक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १३

संभाव्य समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. वेळ प्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार हेमंत गोडसे यांना घेऊन मुख्यमंत्री  यांच्या बरोबर चर्चा करुन तोडगा काढुन हा प्रश्न लवकरच मार्गी लावणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी घाबरुन न जाता एकजुटीने राहावे, आपण शासन दरबारी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडुन न्याय मिळवुन देऊ. म्हणुन शेतकऱ्यांनी खचुन न जाता ठाम राहावे असे प्रतिपादन आमदार हिरामण खोसकर यांनी केले.

इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमीनी पुन्हा एकदा समृद्धी महामार्गासाठी अधिग्रहीत करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. इगतपुरी तालुक्यातील साकुर, गोंदेदुमाला, कुऱ्हेगाव, बेलगाव कुऱ्हे, नांदुरवैद्य व नांदगाव बुद्रुक ह्या गावांतील काही जमिनी पुन्हा जमीनी संपादीत करण्याच्या नोटीसा आल्या आहेत. त्यामुळे शेतकरी भयभीत झाले असुन या पार्श्वभुमीवर घोटी येथे राजाराम साळवी मंगल कार्यालयात आज सर्वपक्षीय व शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला संबोधित करतांना खोसकर म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पात गेल्या आहेत अशा बाधीत शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गालगत पेट्रोलपंप, हॉटेल्स, मॉल आदी व्यवसायासाठी जमीनी संपादित झालेल्या स्थानिक शेतकऱ्यांचा विचार व्हावा, निविदा काढतांना स्थानिक शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य द्यावे, तसेच द्राक्षे, फळे, शेतीमाल बाजारपेठेत विक्री करण्यासाठी समृद्धी महामार्गावरून नेत असतांना स्वतः शेतकरी माल घेऊन जात असेल तर टोलमध्ये सुट मिळावी यासाठी शासन दरबारी प्रयत्न करीन असे आश्वासन दिले.

या बैठकीत माजी आमदार शिवराम झोले, माजी जि. प. सदस्य जनार्दन माळी, माजी सभापती गोपाळ लहांगे, उपसभापती पांडुरंग वारुंगसे, तालुकाध्यक्ष रामदास धांडे, अरूण गायकर, ज्ञानेश्वर कडु, दौलत दुभाषे, राजकुमार चव्हाण, नामदेव भोसले, भास्कर गुंजाळ, रमेश जाधव, सुरेश गणपतदादा कडु, वसंत भोसले, हिरामण कवटे, स्वीय सहायक खंडु परदेशी, संदीप डावखर आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!