इगतपुरी : वैयक्तिक आरोग्याचा परिणाम सार्वजनिक आरोग्यावरही होतो. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे, आणि प्रत्येकाने ती काटेकोरपणे पार पाडली पाहिजे असे आवाहन मुख्याध्यापक मनोज गोसावी यांनी केले. तळेगाव येथील संजीवनी आश्रमशाळेत आज (दि. १८) धनुर्वात प्रतिबंधक लसीकरण शिबीर घेण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले, त्याचबरोबर साथीच्या आजारांबद्दल माहिती देवून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काय काय काळजी घ्यावी याबद्दलही माहिती दिली. नांदगाव सदो प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक भास्कर पराडे, आरोग्य सेविका अश्विनी खेमनार, तळेगाव येथील आशा सेविका नीता पगारे, विमल खाडे यांनी लसीकरण केले.
आश्रमशाळेचे मुख्याध्यापक मनोज गोसावी यांच्यासह भक्ती वाले, वैभव तुपे, निशिगंधा पवार, कपिल सारुक्ते, सागर निकम आदी शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.