
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील कुरुंगवाडी पैकी मारुतीवाडी येथे ३० पेक्षा जास्त आदिवासी कुटुंब राहतात. येथे अंगणवाडी नसल्याने बालकांची नोंद कुरुंगवाडी आहे. मात्र मारुतीवाडीआणि कुरुंगवाडीचे अंतर तीन किमीचे आहे. लांबच्या अंतरामुळे ३ ते ६ वयोगटातील मुले आहार घेण्यासाठी अंगणवाडी केंद्रात जात नाही. हा परिसर हा वन बहुल असल्याने बिबट्या सारख्या प्राण्यांची भीती आहे. मारुती वाडीच्या ३५ मुलांना आहार वाटप केला जात नाही. याबाबत अनेकदा बाल विकास प्रकल्पाधिकारी इगतपुरी यांच्या कडे एल्गार कष्टकरी संघटनेने तक्रार केली. तरीही पोषण आहार वाटप केला न करता काही कार्यवाही सुद्धा केली नाही. त्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडे देखील तक्रार करूनही फायदा झाला नाही. यामुळे आजही तेथील बालके पोषण आहारापासून वंचित आहेत. बाल विकास प्रकल्पाधिकारी इगतपुरी यांच्या निष्काजीपणामुळे या मुलांना त्यांच्या हक्काच्या पोषण आहारापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत शासनाने सेवा पंधरवडा जाहीर केला. मोठ्या थाटात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करून सेवा सप्ताह सुरू केला. हे करून प्रशासनाने स्वतःची पाठ थोपटून घेतली. मात्र या आदिवासी पाड्यावर या चिमुकल्यांना त्यांचा हक्काचा पोषण आहार मिळत नाही. याकडे शासन कधी लक्ष देणार आहे? या वस्तीवर दोन दिवसात पोषण आहार वाटप केला नाही तर बालकांना घेऊन एल्गार कष्टकरी संघटना बाल विकास प्रकल्पाधिकारी यांच्या कार्यालयात अंगणवाडी केंद्र सुरू करणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. म्हणून झोपेचे सोंग घेतलेल्या बाल विकास प्रकल्पाधिकारी यांना आज एल्गार कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सर्व बालकांची अंगणवाडी कार्यालयात भरवून दणका देत अनोखे आंदोलन केले. वर्षभरा पासून येथील मुलांना आहारच मिळाला नसून ऑनलाईन आहार वाटप केल्याची खोटी नोंदणी केल्याचे संघटनेने म्हटले आहे. एल्गार कष्टकरी संघटनेच्या सुरेखा मधे, गणपत गावंडा, काळू निरगुडे, मथुरा भगत, राजू भगत, राजू मेंगाळ, शिवाजी सावंत, हनुमंत सराई, संजय पारधी, कविता खडके, सुनबाई पोकळे, हौसाबाई तेलम, मीराबाई वारे, बुगाबाई गांगड, दिपीबाई झुगरे आदी यावेळी उपस्थित होत्या. सेवा सप्ताहचा गाजावाजा करणाऱ्या प्रशासनाला हे आदिवासी मुले दिसत नाहीत का? एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने प्रशासनाला सवाल हा प्रश्न विचारण्यात आला.
