लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. शैक्षणिक क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकीत नवनव्या अमृतधारा विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचे काम केले जाते. त्यानुसार उपक्रमशील शिक्षिका सुशीला मधुकर चोथवे विविध उपक्रम, प्रयोगातून बौद्धिक व शारीरिक जडणघडणीसाठी विद्यार्थी सक्षमीकरणाचा अजेंडा घेऊन अखंड कार्यरत आहेत. इगतपुरी तालुक्यातील निनावी येथील जिल्हा परिषद शाळेच्या त्या शिक्षिका आहेत. विद्यार्थ्यांसाठी त्या ज्ञानदानासह सामाजिक उपक्रम राबवत असतात. त्यांच्या शिक्षणाचा विद्यार्थ्यांना लळा लागला आहे. नवी पिढी घडवण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण प्रयोगाची विविधता त्या जपत आहेत. शिक्षणाच्या व्रताशी एकनिष्ठ राहून, प्रतिकूल परिस्थितीत अनुकूल कार्य शिक्षिका सुशिला चोथवे यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांना शाळेची, अभ्यासाची गोडी लागावी यासाठी विविध प्रकारचे उपक्रम शाळेत राबवले जातात. विविध जनजागृतीसाठी सुद्धा प्रयत्न केले जातात. त्यांनी याआधी दहीहंडी उत्सव, किल्ले बनविणे, कोलाज काम करणे, पर्यावरण पूरक गणपती मूर्ती कार्यशाळा घेतल्या आहेत. दिवाळीत आकर्षक आकाश कंदील बनवणे, ख्रिसमस ट्री बनविणे, पतंग तयार करणे, विविध नाटिका बसवणे, विविध स्पर्धा, वेशभूषा, रांगोळी, सुंदर हस्ताक्षर, वक्तृत्व, गीत गायन स्पर्धा, शब्द संग्रह आदी उपक्रम त्या राबवितात. दर शनिवार हा “शिकू आनंदे ” या उपक्रमांतर्गत वेगळे उपक्रम शाळेत घेतले जातात. आदिवासी भागातील विद्यार्थी अत्यंत गरीब कुटुंबातील आहेत. वह्या, पुस्तके ह्यावर खर्च करणे पालकांना शक्य नसून घरी अभ्यास घेणे अशक्य असते. शाळेत मिळणारे शिक्षण त्यांची आयुष्याची शिदोरी असल्याने ते स्वयंप्रेरणेने शिकतात. यासाठी प्रभावी उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना पुढे नेण्यासाठी तत्पर आहे असे उपक्रमशील शिक्षिका सुशीला चोथवे यांनी सांगितले.