मार्गदर्शक : मधुकर घायदार
संपादक शिक्षक ध्येय, नाशिक
संपर्क : 9623237135
वाहनाचा शोध लागल्याने मानवी जीवनात मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे कमी वेळेत मोठे अंतर कापणे आता शक्य झाले आहे. गेल्या काही वर्षात भारताने ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. आज भारतात स्वदेशी तसेच विदेशी वाहने उपलब्ध आहेत. रोजगार उपलब्ध करून देण्यामध्ये ऑटोमोबाईल क्षेत्राचा तिसरा क्रमांक लागतो. ऑटोमोबाईल क्षेत्रात मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स तसेच कॉम्प्युटर सायन्सचा वापर केलेला आढळतो. ऑटोमोबाईल उद्योगात मोटारसायकल, कार, ऑटो रिक्षा, ट्रक, बस, ट्रॅक्टर यांचा समावेश असून मारुती, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटो, अशोक लेलॅन्ड, हिंदुस्तान मोटर्स, ह्युंदाई, फोर्ड, फियाट, टोयटा, हिरो, होंडा, स्कोडा, वोल्सव्हगन, ऑडी, रेनोल्ट, बीएमडब्लू आदी कंपन्यांचे विविध उत्पादने विक्री केले जातात.
एकेकाळी श्रीमंतांच्याच दारात दिसणारी वाहने आता सर्वसामान्यांकडेही दिसू लागली आहेत. सभोवती चार चाकी तसेच दुचाकी वाहनाचे वेगळे गॅरेज सुरु झाले आहेत. तसेच वेल्डिंग, टायर देखभाल व दुरुस्ती हे व्यवसायही मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. वाहनाची दुरुस्ती व देखभाल उद्योगात मोठ्या प्रमाणात रोजगार दडलेला आहे. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असून त्याच प्रमाणात गॅरेजची संख्याही वाढत आहे. पर्यायाने युवकांना रोजगाराचे नवे साधन उपलब्ध झाले आहे. सध्या वाहन दुरुस्तीचे कोणतेही प्रशिक्षण नसतांना अनेकांनी हे ज्ञान गॅरेजमध्ये काम करून, निरीक्षण करून मिळविले आहे. आजही अशाच प्रकारे वाहन दुरुस्तीचे काम शिकण्याकडे युवकांचा कल मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
कौशल्य असलेल्या या व्यवसायात चांगली कमाई मिळत असल्याने अनेक युवक याकडे वळत आहेत. थिअरीपेक्षा प्रक्टिकलवर भर देत वाहन दुरुस्तीचे हे ज्ञान एकाकडून दुसऱ्याकडे जात आहे. आज परिस्थिती बदलली आहे. सभोवती गॅरेजची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बाजारात रोज नवनव्या गाड्यांची भर पडत आहे. पेट्रोल नंतर डिझेल इंजिन, सीएनजी, एलपीजी, बॅटरी तसेच सौर उर्जेवर चालणारी वाहने बाजारात दाखल झाली आहेत. नवीन तंत्रज्ञानाच्या आधुनिक गाड्यांचे अद्ययावत ज्ञान, नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑटोमोबाईलचे प्रशिक्षण दिले जात आहे. या अभ्यासक्रमात ऑटोमोबाईलचा इतिहास, दुचाकी, चारचाकी वाहनांची देखभाल, सर्व्हिस टूल, चाकांची देखभाल, ब्रेकची देखभाल, ट्रान्समिशन सिस्टिम्स, इंजिनची सर्विसिंग, रिपेअर व रिप्लेसमेंट, ऑटो इलेक्ट्रिकल, एअर फिल्टर, इंधन फिल्टर, इंजिन ऑईल, स्पार्क प्लग बदलणे, टायर पंचर, व्हील अलायमेंट, नादुरुस्त पार्ट बदलणे आदी बाबींचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते.
पूर्वी गाडी नादुरुस्त झाल्यास अन्य वाहनाद्वारे ती गॅरेजमध्ये आणली जात असे पण आता ‘ऑन द स्पॉट’ सर्विस उपलब्ध करून दिली जात आहे. आज वाहन क्षेत्रात होणाऱ्या प्रगती व संशोधनामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात रोजगाराच्या अनेक नवनवीन संधी उपलब्ध झालेल्या आहेत.
नवीन तंत्रज्ञान शिकून घेण्याची तयारी, कष्ट करण्याची इच्छा, आव्हानात्मक कामाची आवड, प्रामाणिकपणा या गोष्टींची तयारी असेल तर एक चांगली कमाई करून देणारा हा व्यवसाय निश्चितच आहे.