
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या सूचनेनुसार आज सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत “स्वस्थ नारी – सशक्त परिवार शिबिर” पार पडले. शिबिरामध्ये महिलांच्या आरोग्यविषयी तपासणी, कुटुंबाच्या सुदृढतेसाठी आवश्यक माहिती तसेच विशेष तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. एकूण ६५ रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर आवश्यक औषधोपचार करण्यात आले. शिबिरात अस्थिविभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, जनरल मेडिसिन विभाग, नाक-कान-घसा विभाग, आयुष विभाग अशा विविध विभागांचे तज्ञ डॉक्टर व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले यांनी या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.