
इगतपुरीनामा न्यूज – गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने इगतपुरी तालुक्यात दर्शनाला आलेल्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. नाशिक मुंबई महामार्गावरील मुंढेगाव फाट्यावर झालेल्या ह्या भीषण अपघातात २ महिला आणि २ पुरुष असे ४ जण जागीच ठार झाले आहे. भाविकांच्या इको वाहनाला सिमेंट पावडर घेऊन जाणाऱ्या कंटेनरने पुढे फरफटत नेल्याने हा अपघात झाला. इको वाहनातील चार जणांचा दाबल्याने जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातग्रस्त सर्व रहिवासी अंधेरी मुंबई येथील असल्याचे समजते. क्रेनच्या सहाय्याने गाडीखाली दबलेले मृतदेह बाहेर काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दत्ता आम्रे, नित्यानंद सावंत, विद्या सावंत, मीना सावंत सर्व राहणार चार बंगला, अंधेरी मुंबई अशी मृतांची नावे आहेत. महामार्गावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. घोटी पोलीस, महामार्ग पोलीस, टोल नाक्याची टीम घटना स्थळी दाखल झाली आहे. अपघातग्रस्त भाविक मुंढेगावजवळ रामदास बाबा यांच्या मठात गुरुपौर्णिमेसाठी आले होते. दर्शन करून निघाल्यावर त्यांच्यावर काळाचा घाला पडल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.