
इगतपुरीनामा न्यूज – गेल्या एक महिन्यापासून सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या इगतपुरीकरांनी थेट महावितरण कार्यालय गाठून वारंवार वीज खंडित होण्याच्या कारणावर त्यांनी थेट महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सचिन माळी यांना जाब विचारला. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दररोज वीज गेलेली असते, उपकरणे खराब होतात, पण वीज बिल मात्र भरमसाट येते. महावितरणकडून दुरुस्तीचे काम पूर्ण क्षमतेने न झाल्याचे स्पष्ट झाले असून, कर्मचाऱ्यांना सुरक्षा किटसुद्धा उपलब्ध नाहीत. अत्यावश्यक साहित्याचीही कमतरता असल्याचे निष्पन्न झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी स्वतःहून सहभाग घेऊन सुरक्षाविषयक साहित्य खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी कर्मचाऱ्यांची सुरक्षाही धोक्यात आहे. नागरिकांनी महावितरणला पंधरा दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत दुरुस्तीची कामे पूर्ण न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा आणि मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, महावितरणच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावेळी जनसेवा प्रतिष्ठानचे किरण फलटणकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष वसीम सय्यद, शिवसेनेचे शहराध्यक्ष भूषण जाधव, भाजयुमो जिल्हा सरचिटणीस योगेश चांदवडकर, विष्णू डावखर, आकाश डावखर, श्रीकांत मुळीक, निजाम खान, आकाश खारके, तोरिफ कुरेशी, विजय खवळे, सागर चोथवे, व्यापारी असोसिएशनचे बन्सीलाल चांडक, मनोज मणियार, प्रितम पालवे, जेष्ठ नागरिक यांच्यासह महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या उपस्थितीत मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.