स्वराज्य संघटनेच्या मार्फत सामान्य जनतेची कामे करणार : मा.खा.छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे प्रतिपादन! येवला – लासलगाव मतदारसंघातील पहिल्या ‘स्वराज्य’ शाखेचे गोंदेगांवमध्ये उद्घाटन.

निफाड :चंद्रकांत जगदाळे

“छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असलेल्या सुराज्यासाठी स्वराज्यची स्थापना केली आहे. या संघटनेच्या माध्यमातून शासनाकडे खोळंबलेली सामान्य जनतेची कामे मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन स्वराज्य संघटनेचे संस्थापक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज माजी खा. छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले. येवला – लासलगाव मतदार संघातील पहिल्या स्वराज्य शाखेच्या फलकाचे अनावरण त्यांनी गोंदेगाव (ता.निफाड) येथे केले ; त्यावेळी ते बोलत होते. व्यासपिठावर संपर्क प्रमुख करण गायकर, राज्य उपाध्यक्ष विनोद साबळे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी, सचिव शिवाजी मोरे, विजय वाहूळे, नवनाथ शिंदे, ज्ञानेश्वर थोरात, जिल्हाप्रमुख रुपेश नाटे, महिला आघाडी प्रमुख मनोरमा पाटील, पुष्पाताई जगताप, आदी उपस्थित होते.

टाळ मृदुंगाच्या गजरात आणि सजविलेल्या बैलगाडीतून छत्रपती संभाजी राजेंची मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढी पुतळ्यास अभिवादन करून स्वराज्य संघटनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. त्यांनंतर झालेल्या समारंभात संभाजी राजे यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले की,’ शेतकरी, कामगार, शिक्षण, सहकार आणि आरोग्य या पंचसूत्रीवर ही संघटना अवलंबून असून शासनदरबारी या संघटनेच्या माध्यमातून जनतेची कामे करण्यात येणार आहेत. इतर पक्षांप्रमाणे केवळ राजकारण करणे हा या संघटनेचा उद्देश नसून सुराज्य ही संकल्पना डोळ्यांसमोर ठेवून गोरगरिबांना न्याय देण्याची आमची भूमिका आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ही संघटना कटिबद्ध असेल. सामान्य जनतेचा थेट संपर्क माझ्याशी असल्याने ही संघटना बेधडक काम करेल. ‘गाव तेथे शाखा आणि घर तेथे स्वराज्य’ या विचारातून संघटनेचे कामकाज असल्याने संघटनेचा नावलौकिक वाढण्यासाठी शाखाप्रमुखांनी काम करावे,असे त्यांनी सांगितले. यावेळी गोंदेगाव ग्रामपंचायत सरपंच अनिल रणशूर, जगदीश भोसले, नितीन निकम,धीरज भोसले, माधव जगताप, योगेश भोसले, निलेश भोसले, प्रमोद नाईक, शांताराम कांगणे, प्रवीण नाईक, बापू भोसले, आनंद भोसले, सोमनाथ जुगृत, किरण कांगणे, गणेश साळवे, रामा भोसले, निलेश चिखले आदी यावेळी उपस्थित होते.
संभाजी राजे हे काल (दि.०९) पासून दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर असून लासलगाव – येवला मतदार संघात त्यांनी आज २५ शाखांचे उदघाटन केले असल्याची माहिती संपर्क प्रमुख करण गायकर यांनी दिली.

Similar Posts

error: Content is protected !!