निलेश काळे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ९
अतिदुर्गम धामडकीवाडी येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा व राघोजी भांगरे यांची वेशभूषा करून नवचैतन्य निर्माण केले. धामडकीवाडी जिल्हा परिषद शाळेसह घरांना तोरणे, सुबक रांगोळ्या काढण्यात आल्या. शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिनानिमित्त प्रभातफेरी काढण्यात आली.
यावेळी जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या महान आणि अभूतपूर्व कार्याची शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना माहिती दिली. विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी यावेळी आदिवासी पारंपरिक कामड नृत्य सादर केले. याप्रसंगी राज्य आदर्श शिक्षक तथा मुख्याध्यापक प्रमोद परदेशी, दत्तू निसरड, ग्रामपंचायत सदस्य गोकुळ आगिवले, चांगुणा आगिवले, खेमचंद आगिवले, लहानू आगिवले, खेमा आगिवले, चिमा आगिवले, अंगणवाडी सेविका सुनीता दरवडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पिंपळगाव मोर येथे विविध उपक्रम संपन्न
जागतिक आदिवासी गौरव दिन पिंपळगाव मोर येथे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. आदिवासी क्रांतिकारक, बंडकरी हुतात्म्यांना आदरांजली वाहून क्रांतिकारकांनी केलेल्या कार्याला उजाळा देण्यात आला. आदिवासी संस्कृतीचे दर्शन शालेय विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून घडवून आणले. मुलींच्या समूहाने परिधान केलेली फडकी मनमोहक ठरले. बोहडा पथकाने सादर केलेल्या नृत्याने ग्रामस्थांना भुरळ पडली होती. विविध पारंपरिक नृत्यप्रकार सादर करून नृत्याविष्कार दाखविला. विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य आणि एक वही-एक पेन वाटप करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी समूह नृत्य वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला, निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेतील निवडलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून गौरवण्यात आले.रावणाचा मुखडा परिधान केलेला तरुण प्रमुख आकर्षण ठरला. रावणाच्या प्रतिकृतीसोबत फोटो काढण्याचा मोह तरुणांना आवरला नाही.