इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा – तालुका कृषी अधिकारी रामदास मडके

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानाच्या परिस्थितीवर अवलंबून न राहता खरीप हंगामात आपल्या प्रमुख पिकांचा विमा काढून घ्यावा असे आवाहन इगतपुरी तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी केले आहे. शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदत शासनाने दिली आहे. शेतकऱ्यांना महा ई सेवा केंद्र, सामुदायिक सुविधा केंद्र, ग्रामपंचायतींचे संग्राम केंद्र, राष्टीयकृत बँका,येथे पीकविमा काढता येईल. विमा योजनेत सहभागी होण्यासाठी सातबारा, खाते उतारा, आधार कार्ड बँक पासबुक, पीक पेरणी स्वयंघोषणापत्र आणि या वर्षी पासून शेतकऱ्यांचा फार्मर आयडी आवश्यक आहे असेही त्यांनी कळवले आहे. पेरणी न करता पिक विमा भरणे, विमा भरलेल्या पिकाची पेरणी न करणे, सातबारा नसताना विमा भरून शासनाची फसवणूक करण्याच्या प्रकारामुळे प्रामाणिक शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे शासनाने एक रुपयात पीक विमा योजना बंद केली आहे. शेतकऱ्यांना आता भात हेक्टरी 545 रुपये, नाचणी 37 रुपये 50 पैसे, भुईमूग 112 रुपये 50 पैसे, सोयाबीन 810 रुपये 50 पैसे याप्रमाणे विम्यासाठी शेतकऱ्यांना रक्कम भरावी लागणार आहे. यावर्षीपासून पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा बदल केला आहे यावर्षीपासूनही ई- पीक पाहणी अर्थात लागवड केलेल्या पिकाची नोंदणी बंधनकारक करण्यात आहे. नोंदणी केलेले क्षेत्र आणि प्रत्यक्ष पीकविमा काढलेल्या क्षेत्रात तफावत आढळल्यास संबंधित शेतकऱ्याचा विमा रद्द होणार आहे. संबंधित शेतकऱ्याला काळ्या यादीत टाकून पुढील पाच वर्षे कृषी विभागाच्या एकाही योजनेचा लाभ मिळणार नाही. डिजिटल क्रॉप सर्वे या ॲप वरील नोंदणी आवश्यक  करण्यात आलेली आहे.

पिक विमा योजनेअंतर्गत पीक पेरणी पासून कारणीपर्यंतच्या कालावधीत पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी बांधवांना ७२ तासांच्या आत पिक विमा ॲप कंपनी प्रतिनिधी किंवा टोल फ्री क्रमांकवर कळवावे लागणार आहे, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. - किशोर भरते, उप कृषी अधिकारी, इगतपुरी
error: Content is protected !!