शिरसाठे गावात बोलू लागल्या भिंती आणि झाडे : पर्यावरणाची कास धरण्यासाठी उघडली मनामनाची कवाडे

पर्यावरणपूरक शिरसाठे गावाची यशोगाथा २

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २४

इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे ह्या गावाने पर्यावरणपूरक विचारांच्या प्रभावाने उभे केलेले काम सर्वांसाठी दीपस्तंभ ठरत आहे. यासोबतच पर्यावरणविषयक जनजागरण आणि लोकसहभाग यामुळे कौतुकास्पद कामगिरी केली जात आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी संपूर्ण शिरसाठे वासीयांना सॅल्युट केला आहे. ह्या गावासारखे दुर्गम गाव विलक्षण प्रगती करू शकते तर सर्व साधनसामुग्री असणारी गावे सुद्धा आदर्श घेऊन कामे करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिरसाठे गावात पर्यावरण व वातावरणीय बदल लक्षात घेता पंचमहाभूतांवर आधारित माझी वसुंधरा अभियान यशस्वीपणे राबविले जात आहे. त्यामुळे गावाचे रूप पालटण्यासाठी मदत झाली. ‘गाव करी ते राव न करी’ या उक्तीचा प्रत्यय सध्या शिरसाठे गावात येत आहे. माझी वसुंधरा अभियान यशस्वीतेसाठी गावाने वज्रमूठ बांधली आहे. हे अभियान गावात घराघरापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी गावातील भिंतींवर प्लास्टिक बंदी, वृक्ष संवर्धन, पाणी बचत, जैविक शेतीचा वापर, इंधन बचत व ऊर्जा साधनांचा योग्य वापर, विविध शासकीय योजना, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे, वाहतुकीच्या हरित साधनांचा वापर, किचन गार्डन तयार करणे, अन्नाचा अपव्यय टाळणे, ई कचरा व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, शोषखड्ड्यांचा वापर अशा प्रकारे विविध संदेश देणारे चित्र भिंतींवर, झाडांवर रेखाटण्यात आले आहेत.

नाशिक जिल्ह्यात शिरसाठे सारख्या गावाने पर्यावरणपूरक कामांमध्ये केलेली गुणवत्तापूर्ण कामगिरी अतिशय अभिमानास्पद आहे. काळाची पुढची पावले ओळखून ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी केलेले अप्रतिम व्यवस्थापन खऱ्या अर्थाने उन्नत गावाची निर्मिती करणारे आहे. ह्या गावाचा आदर्श घेवुन अनेक गावांची वाटचाल सुद्धा प्रगतीच्या दिशेने होईल असा विश्वास वाटतो.
- लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

पृथ्वी, जल ,अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभूतांचे संवर्धन जतन व्हावे हा संदेश देण्यासाठी टाकाऊ लोखंडी टाक्यांचा पुनर्वापर करण्यात आला. त्यांना सुशोभित करण्यात येऊन गावात दर्शनी भागात टाक्या ठेवण्यात आल्या आहेत. झाडांवर चित्र रेखाटन करून सेल्फी पॉइंट तयार करण्यात आले आहेत, त्यातूनही विविध संदेश दिले जात आहेत. या विविध उपक्रमांमुळे गावात माझी वसुंधरा अभियानास उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

हा यशस्वी प्रकल्प पाहण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील विविध भागातून शिरसाठे गावात गर्दी उसळत आहे. ग्रामसेवक हनुमान दराडे, सरपंच गोकुळ सदगीर, उपसरपंच शीतल विलास चंदगीर, ग्रामपंचायत सदस्य श्यामसुंदर सोपनर, रमेश शिद, तारा गणेश तेलंग, अलकाबाई दोंदे, गणेश तेलंग, विलास चंदगीर, रामदास सदगीर, भावराव गांगुर्डे, ग्राम रोजगारसेवक भास्कर सदगीर, पाणी पुरवठा कर्मचारी संपत सप्रे, संगणक ऑपरेटर रामचंद्र म्हसणे, राखणदार नामदेव सदगीर, काशिनाथ सोपनर, सर्व शिक्षक, विविध संस्था आणि गावातील सर्व ग्रामस्थ या अभियानाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहेत.

भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://igatpurinama.in/archives/8206

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!