
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात मे महिन्यात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची खरीप हंगाम पूर्व कामे रखडली होती. परंतु मागील आठवड्यात पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी राजा खरीप हंगामाच्या तयारीसाठी जोमाने लागला आहे. त्यानुसार कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिकांचे आयोजन करून शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेची महत्त्व सांगण्यात येत आहे. तालुक्यातील प्रमुख भात पिकासाठी ५० हेक्टर क्षेत्रासाठी एक बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवण्यात येत आहे. घरगुती बियाणे वापरायचे असेल तर तीन टक्के मिठाच्या द्रावणाचे बीज प्रक्रिया आणि कंपनीची बियाणे असेल तर आझाटोबॅक्टर, पीएसबी,केएसबी, ट्रायकोडर्मा या जैविक रासायनिक घटकांची बीज प्रक्रिया करून दाखविण्यात येत आहे .या मोहिमेंतर्गत मांजरगाव येथे शेतकऱ्यांना मंडळ कृषी अधिकारी भास्कर गीते, उप कृषी अधिकारी किशोर भरते, शांताराम गभाले यांनी शेतकऱ्यांना भात पिकाच्या बियाण्यासाठी बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवले.
यावेळी पोलीस पाटील कुंडलिक श्रावण गभाले, गोरख सुकदेव गभाले, लक्ष्मण मारुती जाधव, बाळु बारकू गभाले, दगडू बारकू गभाले, इंद्राबाई गभाले, वंदना गभाले, महेश लांडगे आदी उपस्थित होते. रामनगर येथे कृषी विभाग, विभागीय भात संशोधन केंद्र इगतपुरी व बायफ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण, भात नागली, खुरासणी लागवड तंत्रज्ञान, बीज प्रक्रिया याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विभागीय संशोधन केंद्राचे हेमंत पाटील, अविनाश कोळगे, डामसे यांनी लागवड तंत्रज्ञानाची माहिती विशद केली. सहाय्यक कृषी अधिकारी विजय कापसे यांनी बीज प्रक्रियेचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी माजी सरपंच काशिनाथ कोरडे, पोलीस पाटील सिताराम कचरे, नामदेव साबळे, जनार्दन झडे, भाऊराव कचरे भरत जाधव, बायफचे थेटे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. घोटी येथे भात, नागली, वरई या प्रमुख पिकांच्या बीज प्रक्रिया, चतुसूत्री लागवड पद्धत, योजनांविषयी रवींद्र वाघ, तालुका कृषी अधिकारी रामदास मडके, सिनारे यांनी मार्गदर्शन केले. राजेंद्र काळे , तागड मोहन यांनी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवले. कार्यक्रमास सरपंच, प्रगतशील शेतकरी, बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.
बीज प्रक्रिया ही रोग नियंत्रणाची अतिशय साधी, सोपी आणि कमी खर्चाची परिणामकारक पद्धत आहे. यामुळे रोपांची मर होत, बुरशीजन्य रोग होत नाही , रस शोषक किडी जसे मावा, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव होत नाही, रोपे सुदृढ होतात, बियाण्यांची उगवण क्षमता वाढते, रोग झाल्यानंतर नियंत्रणासाठीच्या खर्चात बचत होते. - किशोर भरते, उप कृषी अधिकारी, इगतपुरी