भास्कर सोनवणे, इगतपुरीनामा न्यूज, दि. ९
लंगोटी बांधून पोटापाण्यासाठी जीवघेणा प्रवास…पावसाचा कहर झाल्यावरही ओतप्रोत ओसंडून वाहणाऱ्या नदीतून जगण्याचा खडतर प्रवास करणारे बिचारे आदिवासी बांधव….कोणी आजारी पडलं तर पाठीला बांधून खळाळून वाहणाऱ्या नदीतील प्रवास स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांचा प्रवास सुरू होण्यापूर्वीचा आहे. मात्र याकडे कोणी लक्ष देत नसल्याने निरंतर जीव हातात धरून आदिवासी बांधव वाहणाऱ्या नदीतून प्रवास करीत कसेबसे जगत आहेत. ही भयानक स्थिती डोळ्यांत टचकन पाणी आणणारी आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्याची हद्द आणि विक्रमगड तालुक्याच्या हद्दीवरील वाघ नदीवरील हे अतिशय भयानक चित्र आहे. आपल्या गावाला जायचं असेल तर २५ किलोमीटर वळसा घालून जावे लागते. नदीतून लंगोट बांधून प्रवास केला तर अवघ्या ७ किलोमीटरमध्ये पलीकडे जाता येते.
इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघाचे आमदार हिरामण खोसकर हे मतदार संघाचा प्रवास करीत असताना त्यांना हे जीवघेणे वास्तव निदर्शनास आले. नदीतून प्रवास करणाऱ्या लोकांना आमदार खोसकर यांनी लांबून पाहिले. त्यांनी भरल्या डोळ्यांनी गाडी थांबवली अन पाण्यातून येणाऱ्या लोकांची उत्कटतेने भेट घेण्यासाठी ते अर्धा किलोमीटरवर डोंगर आणि दगड गोट्यांतून पळत सुटले. संबंधित आदिवासी बांधवांना भेटून त्यांनी आस्थेने विचारपूस केली. अखेर ह्या वाघ नदीवर पूल बांधून लोकांचा प्रवास सुसह्य करण्यासाठी १० कोटी रुपयांचा भरघोस निधी द्यायचे त्यांनी जाहीर केले. मात्र ह्या कामाला अजून १० कोटी रुपयांची आवश्यकता असल्याने विक्रमगड तालुक्यातील आमदारांना १० कोटींचा निधी देण्यासाठी आमदार खोसकर यांनी साकडे घातले आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा जिल्हा परीषद गटातील मूलवड ग्रामपंचायत हद्दीतील सावरपाडा येथील वाघ नदीवरील जीवघेणा प्रवास आमदार हिरामण खोसकर यांनी बघितला. अतिशय व्यथित अवस्थेत त्यांनी लंगोट बांधून प्रवास करणाऱ्या आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहेत. देशभर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या जोमात सुरू आहे. मात्र वाघ नदीवर पूल नसल्याने दोन्ही तालुक्यातील किमान ३० ते ३५ आदिवासी वाड्यापाड्यांना वळसा घालून २५ किलोमीटर प्रवास करावा लागतो. हा वळसा वाचवण्यासाठी आदिवासी बांधव पाण्यातून खतरनाक प्रवास करतात.
आमदार हिरामण खोसकर यांनी तातडीने वाघ नदीवरील पूल बांधकामासाठी १० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. तथापि हे काम पूर्ण करण्यासाठी अजून १० कोटींचा निधी लागणार आहे. नदीच्या एका भागात पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्याची तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्याची हद्द आहे. ह्या कामामुळे दोन्ही जिल्हे आणि तालुके कायमची जोडली जाणार आहेत. त्यामुळे विक्रमगड तालुक्यातील आमदारांकडून १० कोटींचा निधी मिळण्यासाठी त्यांना सांगण्यात आले आहे. लवकरच ह्या भागातील हे विदारक चित्र आमदार खोसकर यांच्या प्रयत्नांनी कायमचे मिटणार आहे.
त्र्यंबकेश्वर आणि विक्रमगड ह्या दोन्ही तालुक्यांना जोडणाऱ्या वाघ नदीतुन माझे आदिवासी बांधव जीवघेणा प्रवास करत असतात. हे मी ऐकले होते मात्र प्रत्यक्षात पाहिल्यावर माझ्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. ह्या नदीवर पूलाचे बांधकाम करण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी देणार आहे. उर्वरित १० कोटी निधीसाठी संबंधित आमदारांच्या कानावर घातले आहे. लवकरच हा प्रश्न कायमचा सुटेल असा विश्वास वाटतो.
- हिरामण खोसकर, आमदार इगतपुरी त्र्यंबकेश्वर