❝ आयुष्याच्या साधने ❞ – लेखन : ह.भ.प. प्राचार्य समीर धर्मराज महाले, भगूर, ९५५२५९३०२६

आयुष्याच्या साधने । सच्चिदानंद पदवी घेणे । या तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे आज १० जूनला अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत असलेले जगद्‌गुरू द्वाराचार्य विद्यावाचस्पती सदगुरू डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर यांच्या रामकृष्ण ते श्रीमहंत महामंडलेश्वर द्वाराचार्य डॉ. रामकृष्ण महाराज इथपर्यंच्या साधनेचा एक तेजस्वी जीवनप्रवास हा थक्क करणारा प्रेरणा देणारा असाच ठरावा. माणसाच्या आयुष्यात महानतेचा कस कशावरून ठरवला जातो? धनसंपत्तीवरून नाही, तर त्याच्या विचारसंपत्तीवरून समाजासाठी केलेल्या कार्यावरून आणि जीवनातून प्रकट होणाऱ्या जीवन मूल्यांवरून आणि अशा तेजस्वी, पारमार्थिक साधकाचा त्यांच्या साधनेचा एक अल्पसा परिचय हा मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरावा असाच आहे.

शिक्षण : महाराजांचा जन्म नाशिक या पवित्र तीर्थक्षेत्री १० जुन १९५१ रोजी झाला. बालपणापासूनच अध्यात्म साधना, राष्ट्रभक्ती, धर्मनिष्ठा आणि शिक्षणाविषयी अतिशय आवड असल्याने, तत्वज्ञान व धार्मिक शिक्षणाचे धडे अत्यंत अधिकारी ज्ञानवंत, प्रज्ञावंत असणाऱ्या विविध सदगुरूंकडून घेतले. त्यात प्रामुख्याने प्राचार्य सोनोपंत दांडेकर मामा यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली भक्तीचळवळीचा व तत्वज्ञानाचा अभ्यास केला. गुरूवर्य ह.भ.प. सोपानकाका देहूकर, धुंडामहाराज देगलूरकर, शंकरमहाराज कंधारकर, आनंद महाराज वैजापुरकर, रंगनाथ महाराज परभणीकर यांच्याकडून प्रतिवर्षी चातुर्मासात अध्यात्मिक व तत्वज्ञानाचा अभ्यास केला. पंडित सातवळेकर शास्त्री गुजरात यांचेकडे संस्कृत साहित्य, वेदांत प्रस्थानत्रयी व उपनिषदांचे ज्ञान घेतले. सूर्यपूर संस्कृत महाविद्यालय सूरत, कैलास आश्रम ऋषिकेश, अभय संन्यासाश्रम बनारस येथे संस्कृत साहित्याचे अध्ययन केले. संस्कृत साहित्य आचार्य (एम.ए.) अहमदाबाद व बनारस विश्वविद्यालयातून पदवी संपादन केली व मराठी साहित्यात २००६ साली “पीएचडी” पदवी मिळाली, संत तुकोबारायांचा लोकसंवाद तत्वज्ञान व काव्यशैली (चिकित्सक अभ्यास) या विषयात त्यांनी पीएचडी पदवी संपादन केली. मिळवलेले ज्ञान हे केवळ आपुल्यापुरतेच न ठेवता त्याचा समाजासही उपयोग व्हावा या हेतूने विचारपूर्वक आणि अत्यंत अभ्यासपूर्वक वीस ग्रंथाचे लेखन, संशोधन व प्रकाशन देखील केले.

संशोधन व प्रकाशने : वारकरी संप्रदायाची लोकपरंपरा या विषयावर क्षेत्रीय संशोधन, आयुष्याच्या साधने (जगद्‌गुरू तुकाराम महाराज) संशाधनात्मक चिंतनग्रंथ. भाग्य आम्ही तुका देखिलेया (समिक्षा व चिंतनग्रंथ), जगद्‌गुरू भक्तियोगी श्रीतुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठगमन ऐश्वर्ययोग (संशोधनात्मक चिंतनग्रंथ), लोकी अलौकिक तुकाराम (शोधप्रबंध), संत तुकाराम महाराज मराठी संस्कृती अभ्यासन, पुणे विद्यापीठ परिचय पुस्तिका, अध्यासन संकल्पना व कार्यपध्दती या विषयावर स्वतंत पुस्तिकेचे संपादन व प्रकाशन, संत तुकाराम यांच्या अभंगांची संप्रेषण सिध्दांताच्या आधारे तत्वज्ञानात्मक व वैचारिक चिकित्सा. श्री तुकोबारायांचे मनोविज्ञान राजनीती संबंधीचे प्रतिपादन, अध्यात्मिक समतेचा पुरस्कार आणि वारकरी संप्रदायाच्या वैचारिक आंदोलनाची सांस्कृतिक बैठक विषद करणारा ग्रंथ, देहूकर सांप्रदायिक ओळींची सार्थ गाथा (२ खंड प्रकाशित), ओळींची गाथा : श्री तुकाराम महाराज यांच्या सांप्रदायिक अभंगांची संशोधित गाथा संहिता संपादन तत्वानुसार संपादन, संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या अभंगाची गाथा संशोधित आवृत्तीचे संपादन, भक्ती चळवळ आणि वारकरी संप्रदायाच्या बौध्दीक व अध्यात्मिक गरजा लक्षात घेऊन सार्थ हरिपाठ, वारकरी नियमावली, अभंग मालिका इ. पुस्तकांचे प्रकाशन, संत तुकोबाराय यांच्या विचारदर्शनाचे २ खंड प्रकाशित, संत तुकोबाराय का लोकसंवाद तत्वज्ञान और काव्यशैली (हिंदी अनुवाद डॉ. अशोक धुलधुले), तुका आकाशाएवढा (शोधनिबंध) महाराष्ट्र साहित्य पत्रिका, पुणे, वारकरी संप्रदाय : तत्वज्ञान व इतिहास संशोधक, धुळे, जगद्‌गुरू तुकाराम महाराज संपूर्ण अभंगगाथा अर्थ निर्धारण, भक्तियोगी तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन, ऐश्वर्ययोग इंग्रजी भाषा आवृत्ती, संपूर्ण अभंगगाथेचे अर्थनिरूपण, इंग्रजी भाषा प्रथम खंड, इत्यादी संशोधित ग्रंथांचे विपुल प्रमाणात लेखन व प्रकाशन केले. याबरोबरच समाजामध्ये वैचारिक जागृती घडावी या उद्देशाने सामाजिक व सांस्कृतिक कार्य हाती घेतले.

सामाजिक व सांस्कृतिक कार्ये : भक्ती चळवळ, वारकरी संप्रदाय, निती शिक्षण, सामाजिक समस्या आदी विषयांवर विविध वृत्तपत्रे व नियतकालिकांतुन लेखन प्रसिध्द केले. महाराष्ट्रभर, महाराष्ट्राबाहेर कीर्तन प्रवचनांच्या माध्यमातून लोकजागृती करण्यास १९६८ पासून सुरूवात करून आजतागायत दररोज कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन अविरतपणे महाराज करत आहे. शंभराहून अधिक कीर्तन प्रवचनांच्या ध्वनीफिती व चित्रीफिती प्रकाशित असून पन्नास ध्वनीफिती ह्या केवळ संत तुकोबारायांच्या चरित्र व तत्वज्ञानावर आधारीत आहेत. संत तुकोबारायंच्या जन्मचतुः शताब्दी वर्षा निमित्ताने तसेच संत ज्ञानेश्वर महाराज समाधी संस्थान आळंदी, भंडाराडोंगर संस्थान देहू, चिंचवड मुंबई येथे संत तुकाराम महाराज चरित्र व तत्वज्ञानावर प्रत्येकी १० दिवसांचे भव्य प्रवचन सत्संगाद्वारे समाजप्रबोधन केले. संत तुकाराम महाराजांच्या भक्ती चळवळीला सुसंघटित व एकात्मिक वैचारिक चौकट देण्यासाठी ९६५ मंदिरांची निर्मिती करून या माध्यमातून लोकशिक्षणाच्या चळवळीचा विस्तार प्रचार प्रसार केला. लोकनेते बाळासाहेब भारदे व अण्णा हजारे यांच्या समवेत आदर्श ग्राम व्यसनमुक्ती, जलसंधारण, अस्पृशता चळवळीत प्रत्यक्ष सहभाग घेतला. गाव तिथे गंथालय या चळवळीत सक्रीय सहभाग घेऊन ग्रंथालयांची निर्मिती करून वाचन संस्कृती रूजविली. वैचारिक धर्मप्रचार प्रसाराचे कार्य अविरतपणे केले व करीत आहेत. त्यांच्या कार्यासंबंधी समग्र महाराष्ट्राला, वारकरी संप्रदायास पूर्णपणे जाणीव आहे. आपले कार्य ते केवळ नाशिक जिल्हा, महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर अतिशय प्रभावीपणे करत आहे. त्यांच्या याच प्रभावी कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासन व विविध नामवंत संस्थांकडून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

विविध पुरस्कार व मान सन्मान : संत साहित्य संशोधनाबद्दल महाराष्ट्र शासनाचा मानाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने २०१० मध्ये सन्मानित करण्यात आले. श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने संत तुकाराम महाराज सेवा पुरस्कार तसेच पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील समाज प्रबोधन पुरस्कार, संत प्रसाद जीवन गौरव पुरस्कार, खान्देश रत्न पुरस्कार, झी वाहिनीतर्फे वारकरी भुषण पुरस्कार, संतधाम संस्थेतर्फे कीर्तनमार्तंड उपाधीने सन्मानित करण्यात आले असुन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संत तुकाराम अध्यासनपदी प्रमुख तथा प्राध्यापक म्हणून महाराजांची सार्थ निवड केली. त्यांच्या या दैदिप्यमान कार्याची दखल भारतीय संन्याशी वैरागी साधू आखाड्यांकडून घेतली जाऊन कुंभमेळ्यात निर्मोही आखाडा परंपरेतुन जगद्‌गुरू द्वाराचार्य या पदाने विभुषित करून गौरवान्वित करण्यात आले. यासोबतच महाराजांची विविध संमेलनाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. त्यात प्रामुख्याने पहिले वारकरी कीर्तन संमेलन माळशिरस, सातवे अखिल भारतीय संत साहित्य संमेलन गोंदिया, उत्तर महाराष्ट्र संत साहित्य संमेलन धुळे येथे संमेलनाध्यक्ष पदे महाराजांनी भूषविली आहेत.

वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार, संत तुकोबारायांचे तत्वज्ञान, लोकशिक्षण, लोकसंवाद, संतांची शिकवण, समाजप्रबोधन, समाज जागृतीचे ध्येय, व्रत मनाशी बाळगून महाराज व्रतस्थपणे आयुष्यभर सेवारत आहेत. आज ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्षातही अखंडपणे कार्यरत आहेत. त्यांच्या या अलौकीक दैदीप्यमान कार्यासाठी कृतज्ञतेच्या भावनेतून सर्व शिष्य व भक्तपरिवाराकडून अमृत महोत्सव कृतज्ञता व्यक्त होत आहे. महाराज आपण आपल्या कार्यातून, उपदेशांतून महाराष्ट्रभर, भारतभर आमच्या सारख्या असंख्य असणाऱ्या आपल्या शिष्यांना, भक्तांना कृपाशीर्वाद दिले आहेत. आपले जीवन व्रतस्थपणे कार्यरत असणाऱ्या साधकाचे आहे. आपण आपली साधना आयुष्यभर करणार आहात यासाठी पांडुरंगाने आपणास निरोगी दिर्घायुष्य द्यावे हीच पांडूरंग चरणी प्रार्थना करतो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे अशा आपल्या अमृतमहोत्सवी साधनेस सर्व शिष्य व भक्त परिवारातर्फे शुभेच्छा देतो !

error: Content is protected !!