लोकाभिमुख अधिकारी उमाकांत देसले यांच्या तत्परतेमुळे देवपूर ते पंचाळे रस्ता झाला खड्डेमुक्त : समयसुचकतेने कार्यवाही केल्याने नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव

इगतपुरीनामा न्यूज, दि. २४

चांगले आणि अपघातमुक्त रस्ते म्हणजे आजच्या काळात नागरिकांचा आत्मा आहे. दळणवळणाची व्यवस्था चांगली असेल तर विकासाच्या कार्याला चांगलाच हातभार लागतो. असे असले तरी अनेक रस्त्यांच्या व्यवस्थेकडे सर्रासपणे शासनाचे अधिकारी दुर्लक्ष करतात. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढून नागरिकांचा हकनाक बळी जात असतो. यामुळे अनेक सामाजिक प्रश्नांना नागरिक सामोरे जातात. अशा बिकट काळात संवेदनशील मनाचे लोकाभिमुख अधिकारी असतील तर ते कौतुकाला पात्र ठरतात. सिन्नरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता उमाकांत देसले यांच्या तत्पर कार्यशैलीने रस्त्याची दुरुस्ती झाल्याने सिन्नर तालुक्यात त्यांचे कौतुक सुरू आहे. देवपूर ते पंचाळे रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असल्याचे ग्रामपंचायत सदस्य सुनील उर्फ महेश थोरात यांनी उमाकांत देसले यांच्या कानावर घातले. लगेचच समयसुचकतेने श्री. देसले यांनी तक्रारीची दखल घेऊन तातडीने दुरुस्त करून घेतले. असंवेदनशीलतेचा अनुभव असणाऱ्या ह्या भागातील नागरिकांसाठी ही घटना आश्चर्यकारक होती. नागरिकांनी तातडीने उमाकांत देसले यांच्यावर भ्रमणध्वनीद्वारे आभाराचा वर्षाव केला.

देवपूर ते पंचाळे रस्त्यावरील जीवघेणे खड्डे डांबरी पॅच देऊन दुरूस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता उमाकांत देसले यांनी तत्परतेने कार्यवाही केली. त्यामुळे लोकाभिमुख शासकीय अधिकारी अजूनही असल्याची साक्ष आम्हाला पटली. त्यांच्यामुळे काम पूर्ण झाल्याने ह्या रस्त्यावर आता खड्ड्यांमुळे अपघात होणार नाहीत. ह्या भागातील नागरिकांतर्फे मी उमाकांत देसले यांचे आभार मानतो.
- सुनील उर्फ महेश थोरात, ग्रा. पं. सदस्य पंचाळे

राज्य मार्ग क्रमांक ३५ देवपूर ते पंचाळे दरम्यानचा रस्ता अतिशय खराब झालेला होता. ठिकठिकाणी मोठेमोठे खड्डे पडलेले होते. या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून दुरुस्ती करावी. एकाच आठवड्यात 3 अपघात होऊन नागरिकांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली असल्याने या रस्त्यावरील किमान मोठे खड्डे तरी तातडीने डांबरी पॅच देऊन बुजविण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य सुनील उर्फ महेश थोरात यांनी सहाय्यक अभियंता उमाकांत देसले यांना कळवले. उमाकांत देसले यांनी तातडीने दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता दुरुस्तीचे काम जवळपास पूर्ण केले आहे. तांत्रिक अडचणींमुळे डांबराची कमतरता असल्याने खडी मुरूम टाकून तात्पुरती डागडुजी केली. त्यानंतर पक्के डांबरी पॅच देऊन कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात आली. देवपूर पंचाळे दरम्यानच्या रस्ता डागडुजीचा ठेका संपलेला असून नूतनीकरण होण्यासाठी काही कालावधी जाणार आहे. अशा अवस्थेत तक्रारीचे आणि झालेल्या अपघातांचे गांभीर्य लक्षात घेऊन उमाकांत देसले यांनी तातडीने केलेली कार्यवाही नागरिकांसाठी आनंददायी ठरली आहे. काम सुरू असताना पंचाळेचे प्रभारी सरपंच प्रकाश थोरात, शिवाजी बेलोटे, पंडित थोरात, सुनील थोरात, अरुण थोरात, रामू थोरात, शिवा  आसळक, शिवा थोरात, भाऊसाहेब माळोदे, शिवाजी तळेकर, शंकर थोरात, विलास कोल्हे, अजय मिस्तरी, शरद सैंद्रे, पर्यवेक्षक चव्हाण, विश्वनाथ शिरोळे, संपत गडाख आदींसह पंचाळे, देवपूर गावातील अनेक ग्रामस्थांनी सहाय्यक अभियंता उमाकांत देसले यांचे आभार मानले आहेत.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!