
सुनिल बोडके : इगतपुरीनामा न्यूज, दि. ९
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरशेत ग्रामपंचायत अंतर्गत सावरपाडा येथील पाड्यावरील तास नदीवर ग्रामस्थांसहित महिला वर्ग विद्यार्थी यांचे नदीवरून ये जा करताना मोठी कसरत करावी लागत असल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. स्वतंत्र भारतात सामान्य माणसाला अजूनही साध्या गोष्टीसाठी मोठा संघर्ष करावा लागतो. या प्रकरणामुळे जगाच्या लक्षात तरी आले सामान्य माणूस काय स्थितीत जगत असेल ? तारेवरची कसरत करत लोक जीवन जगत असल्याचे वृत्त वाऱ्या सारखे पसरल्याने राज्याचे पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे यांनी तात्काळ दखल घेत थेट मुंबईतुन माणूस पाठवून खरशेत वासीयांचे अश्रु पुसण्याचे काम केले आहे.
आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या माध्यमातून युवासेनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने सरपंच दळवी व ग्रामस्थांच्या समोर शिवसेनेच्या स्वखर्चाने लोखंडी पुलाची रक्कम रुपये १ लाख २५ हजार रोख स्वरूपात ठेकेदार दत्ता पवार यांच्याकडे सुपूर्द करून तात्काळ पुलाच्या कामाचा शुभारंभ केला. त्यामुळे अवघ्या काही तासात मार्ग सुकर केला. बाकीच्या कामांसाठी लवकरच मंत्रालयात बैठक लावून बाकीच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासन शिष्यमंडळाच्या वतीने देण्यात आले. जल जीवन मिशन अंतर्गत चोख पाणी पुरवठा योजना राबविण्यावर भर दिला जाईल असे सांगण्यात आले. यावेळी शिवसेना सचिव सूरज चव्हाण, युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तीकर, युवासेना जिल्हाप्रमुख राहुल ताजनपुरे, शिवसेना तालुका समन्वयक समाधान बोडके पाटील, त्र्यंबकेश्वर शिवसेना तालुकाप्रमुख संपतराव चव्हाण, रघुनाथ गागोडे, धिरज पागी, कल्पेश कदम, रामनाथ बोडके, संदीप चव्हाण, प्रमोद कोहोकडे, सार्थक पन्हाळे, प्रमोद कोथमिरे, सरपंच दळवी यांच्यासह खरशेत शेंद्रीपाडा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.