स्पर्धा परीक्षेतील मराठी भाषा व साहित्य

विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी भाषा आणि साहित्य परंपरा या विषयांसह विविध साहित्य प्रकारांचे साहित्यिक यांच्याबाबत विद्यार्थ्यांना प्रचंड अज्ञान असते. यामुळे नेमकं अपयश इथूनच सुरू होतं. अपयशाचे रूपांतर यशात करायचं असेल तर हा लेख वाचायला हवाच.

मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क : 9822478463

महाराष्ट्र व मराठी भाषा
महाराष्ट्र राज्यातील प्रमुख भाषा मराठी ही होय. महाराष्ट्रातील जनतेची ही मातृभाषा होय. मराठी भाषा आणि साहित्य यासंदर्भात तलाठी भरती परीक्षा, पोलीस शिपाई भरती परीक्षा, ग्रामसेवक परीक्षा, शिक्षक पात्रता परीक्षा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा तसेच महाराष्ट्र राज्य पातळीवर ज्या परीक्षा होतात त्यामध्ये मराठी भाषेचा इतिहास, मराठी साहित्याचा इतिहास, मराठी साहित्यातील महत्वाचे पुरस्कार, मराठी साहित्यातील महत्वाच्या साहित्यकृती आणि लेखक यासंदर्भात प्रामुख्याने प्रश्न विचारले जातात.

प्रश्नांचे स्वरूप
हे विचारले गेलेले प्रश्न जर बघितले तर ते आपण इयत्ता बारावी पर्यंतचा जो मराठीचा अभ्यास केलेला आहे त्यावरच आधारित असतात. असे असले तरी हे प्रश्न परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना अवघड वाटतात. याचे कारण आपल्या भाषेकडे विद्यार्थी म्हणावे तितके गांभीर्याने पहात नाही. त्यामुळे शालेय स्तरावर, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर याचा अभ्यास केलेला असला तरी सुध्दा हे प्रश्न अवघड वाटतात.

मराठी साहित्यातील महत्वाचे
आपल्या मातृभाषेतील साहित्यात महत्वाचे साहित्य आणि लेखक कोणते आहेत ? यावर साधारणतः हे प्रश्न असतात. उदा. तलाठी भरती परीक्षेत विचारलेला प्रश्न : राम गणेश गडकरी यांनी कोणत्या टोपणनावाने लेखन केले ?
A. माधवानुज
B. कुसुमाग्रज
C. बालकवी
D. गोविंदाग्रज
या प्रश्नाचे योग्य उत्तर D गोविंदाग्रज हे आहे. अतिशय सोपा प्रश्न, आपण बारावीपर्यंतच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकात गोविंदाग्रज यांची कविता अभ्यासली आहे. त्यामुळे या प्रश्नात नवे असे काहीच नाही. या प्रश्नातील सर्व पर्याय आपण पाहू. डॉ. काशिनाथ हरि मोडक यांनी माधवानुज या टोपणनावाने लेखन केले. विष्णू वामन शिरवाडकर यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने काव्यलेखन केले. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी बालकवी या नावाने काव्यलेखन केले आहे. राम गणेश गडकरी यांनी काव्यलेखन गोविंदाग्रज या नावाने केले तर विनोदी लेखन बालकराम या नावाने केले आणि नाटके राम गणेश गडकरी या नावाने लिहिली हे लक्षात ठेवा.

ज्ञानपीठ पुरस्कार
भारतामध्ये साहित्यासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार हा होय. अनेक स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला तर यावर हमखास प्रश्न विचारला जातो. उदा. पोलीस शिपाई भरती परीक्षेत विचारला गेलेला प्रश्न : खालीलपैकी कोणत्या लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही ?
A. वि. स. खांडेकर
B. वि. वा. शिरवाडकर
C. विंदा करंदीकर
D. ना. सी. फडके
या प्रश्नाचा योग्य पर्याय D ना. सी. फडके हा होय. आतापर्यंत मराठीतील वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे या मराठी लेखकाना ज्ञानपीठ हा साहित्यासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार मिळालेला आहे. ही मराठी साहित्य विश्वातील महत्वाची घटना होय. त्यामुळे हा प्रश्न वेगवेगळ्या पध्दतीने देखील अनेक परीक्षांमध्ये विचारला आहे. उदा. १. ‘ययाती’ या कादंबरीचे लेखक कोण ? ( वि. स. खांडेकर ), २. मराठीतील कोणत्या लेखकाला सर्वप्रथम ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला ? ( वि. स. खांडेकर ), ३. ‘विशाखा’ या काव्यसंग्रहाचे कवी कोण ? ( कुसुमाग्रज ), ४. ‘नटसम्राट’ या नाटकाचे लेखक कोण ? ( वि. वा. शिरवाडकर ), ५ . ‘कोसला’ या कादंबरीचे लेखक कोण ? ( भालचंद्र नेमाडे ) आदी अशाप्रकारचे प्रश्न देखील विचारलेले आहेत .

मराठी साहित्य इतिहास
थोडक्यात मराठी साहित्य आणि भाषेच्या संदर्भात  इतिहास, परंपरा, महत्वाच्या घटना, पुरस्कार, साहित्य प्रकार, टोपणनावे, साहित्यातील नवे प्रवाह, चर्चेतील लेखक, साहित्य व भाषेचा संदर्भ असलेली स्थळे आदी संदर्भात प्रश्न विचारले गेल्याचे  दिसते. विद्यार्थ्यांनी यावर भर द्यावा म्हणजे सर्व अभ्यास घटकांचा खोलवर अभ्यास होतो व आपण इतरांपेक्षा पुढे असतो. हे महत्वाचे होय. उदा. विविध प्रश्नपत्रिकेतील विचारलेले प्रश्न पहा. १. मराठीतील पहिल्या कांदबरीचे लेखक कोण ?
A. बाळशास्त्री जांभेकर
B. विष्णुबुवा ब्रम्हचारी
C. बाबा पदमनजी
D. ह. ना.आपटे
या प्रश्नाचे योग्य उत्तर C बाबा पदमनजी हे होय. बाबा पदमनजी यांनी इ. स. १८५७ मध्ये ‘यमुना पर्यटन’ ही कादंबरी लिहिली. ही मराठी भाषेतील पहिली कादंबरी होय. मराठीतील ही पहिली सामाजिक कादंबरी देखील आहे. या महत्वाच्या घटनेवरील विचारलेले प्रश्न पहा. १. मराठीतील पहिली कादंबरी कोणती ? ( यमुना पर्यटन ), २. मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती ? ( यमुना पर्यटन ), ३. ‘यमुना पर्यटन’ ही कादंबरी इ.स. ………. मध्ये प्रकाशित झाली ( १८५७ ).

काळजीपूर्वक केलेला अभ्यास
वरील सर्व चर्चेचा थोडक्यात आशय असा की आपण अभ्यासक्रमातील ज्या घटकाचा अभ्यास करीत आहोत त्यातील घटक व त्यावर पूर्वीच्या झालेल्या प्रश्नपत्रिकेत विचारले गेलेले प्रश्न याचा काळजीपूर्वक, बारकाईने विचार केला, अभ्यास केला तर अवघड काहीच नाही हे तुमच्या लक्षात येईल.
                   
( लेखक इगतपुरी येथील केपीजी कॉलेजचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. )

Similar Posts

2 Comments

  1. avatar
    विलास जोपळे says:

    मराठी भाषा म्हणून आपण दुर्लक्ष करतो पण,या घटकावरील प्रश्न हे सोपे तर असतात.परंतु आपल्या परिचयाचे देखील असतात. उजळणी नसल्या कारणाने, आपण मार्क गमावून बसतो. वाचन महत्त्वाचे आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!