भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – सध्याचे विवाह सोहळे सामान्य माणसांचे कंबरडे मोडणारे ठरत आहेत. अनाठायी बाबींवर होणारे खर्च, कर्ज काढून दिखावू झगमगाट, डीजेचा कर्कश्य आवाज, दारूबाजी, अनेकांचे रुसवेफुगवे यामुळे लग्नसोहळे संस्कृतीचा ऱ्हास करणारे होताहेत. या भयंकर स्थितीमुळे समाजाची नितिमूल्ये लोप पावत चालली आहे. म्हणून चांगल्या परंपरा आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील वारकरी तरुणाने आपला स्वतःचा विवाह वारकरी विचारधारांना अनुसरून अनोखा आणि दिमाखदार केला आहे. ह्या अदभूत नयनरम्य विवाह सोहळ्याच्या निमित्ताने सर्वांपुढे वेगळा आदर्श निर्माण झाला आहे. परम परमात्मा पांडुरंगाच्या ज्ञानोबा तुकारामांचे वारकरी व छत्रपती शिवरायांचे धारकरी दोघांच्या एकत्रीकरणामुळे ह्या विवाह कार्यक्रमात अप्रतिम सौंदर्य सर्वांनी डोळ्यांत साठवले. नाशिक जिल्ह्यासह वारकरी परंपरेतील समाजाच्या विविध स्तरावर ह्या आकर्षक विवाहाची चर्चा सुरु आहे. ( बातमीच्या शेवटी व्हिडिओ पाहता येईल. )
घोटी बुद्रुक येथील सौ. सुनीता व श्री. दत्तू किसन खातळे यांचे चिरंजीव हभप तुषार महाराज खातळे आणि कोनांबे येथील सौ. सुभद्रा व श्री. दामू रामभाऊ डावरे यांची सुकन्या चि. सौ.का. वेदांश्री दामू डावरे ह्यांचा प्रेरणादायी विवाह सोहळा रविवारी संपन्न झाला. “डीजे तिथे बाटली आणि बाटली तेथे भांडण” असे सगळीकडे समीकरण निर्माण झाल्याने कार्यक्रमात डीजे टाळण्यात आला. ध्वनीप्रदूषण मुक्त आणि सुसह्य वातावरणामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले. फटाक्यांचा अजिबात वापर न करता अपार उत्साह निर्माण करता येतो हे ह्या सोहळ्यातून सिद्ध करून दाखवण्यात आले. यासह टॉवेल, टोपी, फेटे, मानपान ह्या अनिष्ट प्रथांना तिलांजली देण्यात आली. टाळ, विणा आणि पखवाजाच्या तालावर नृत्य करत ज्ञानोबा तुकाराम या भजनाच्या नादात नवरदेव नवरीचा लग्न मंडपात प्रवेश झाला. यावेळी दोघांनीही वारकरी पद्धतीने नृत्य करून उपस्थितांचे मन जिंकले. आळंदीवरून आलेल्या वारकरी बाळगोपालांनी त्यांना यावेळी साथ दिली. ह्या लग्न सोहळ्यात आळंदी येथील ज्ञानोदय वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी “ज्ञानोबा तुकोबांचे वारकरी” यांनी “पाऊल्या” हा नृत्यप्रकार सादर केला. ह्या संस्थेचे संस्थापक स्वतः नवरदेव हभप तुषार खातळे हे आहेत. नांदगाव सदो येथील छड्डी पट्टा आखाडा व हनुमान आखाडा यांनी “छत्रपती शिवरायांचे धारकरी” साकारून सर्वांना लाठीकाठी, छड्डी पट्टा, दांडपट्टा यांचे मोहक सादरीकरण केले. ह्या प्रेरक विवाह सोहळ्यात विविध क्षेत्रातील नामांकित मान्यवर मंडळी उपस्थित होते.