
लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात ४८ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजनेअंतर्गत वारसांकडून ३४ दावे मंजूर असून त्याचे ६८ लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर झाले आहे. त्यातील काही वारसांना त्याची रक्कम मिळाली असून लवकरच उर्वरित वारसांना सानुग्रह अनुदान वाटप केले जाणार आहे. कागदपत्रांच्या अपुर्तेमुळे १० प्रस्ताव प्रलंबित आहे. निकषात न बसलेले ४ प्रस्ताव नामंजूर झाले असल्याची माहिती इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी दिली. अधिक माहितीसाठी इगतपुरीच्या तालुका कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके, कृषी पर्यवेक्षक किशोर भरते यांनी केले आहे. शेती करतांना तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्यास त्या अपघातग्रस्त कुटुंबियांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना लाभदायक ठरत आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेची जबाबदारी कृषी पर्यवेक्षक यांची असून सर्व कागदपत्रे तपासून परिपूर्ण प्रस्ताव कार्यालयास सादर करण्याचे काम संबंधित कृषी पर्यवेक्षक हे करत असतात. त्यामुळे मार्गदर्शन मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.