
इगतपुरीनामा न्यूज :
दिनांक 5 एप्रिल वार शनिवार रोजी कॉम्रेड उदाराम तुळशिराम देवरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय करंजाड येथे एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आपली भारतीय संस्कृती ही खूप महान संस्कृती आहे. भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे. अनेक धर्म, अनेक पंथ, अनेक संप्रदाय, अनेक जाती आपल्या देशात आहेत. या सर्वांना एकत्र आणणारे सण उत्सव जणू हृदय बंधनेच असतात. एकमेकांमध्ये असलेल्या द्वेषभावनेची तीव्रता सण-उत्सव कमी करत असतात. म्हणून सण आणि उत्सव हा भारतीय जीवनाचा गाभाच आहे असे म्हणायला हरकत नाहीं. आजच्या यंत्र युगातील माणसाच्या रूक्ष आणि साचेबंद जीवनात विरंगुळ्याचे सुखा समाधानाचे आनंदाचे काही क्षण यावेत व हर्ष उल्हासाचे क्षण सर्वसामान्य माणसांनाही उपभोक्ता यावेत यासाठी सण समारंभाची सांगड धार्मिक विधींशी, व्रतांशी आणि इतिहासकालीन, पौराणिक अशा असामान्य, अलौकिक व्यक्तींच्या पुण्यस्मरणाशी घालण्यात आलेली आहे. त्यासाठी पूर्वजांनी काही मार्ग आखून दिलेले आहेत ते मार्ग नंतर येणाऱ्या पिढ्या मोठ्या श्रद्धेने आणि आत्मियतेने अनुसरत असतात. पूर्वजांनी आखून दिलेला सन्मार्ग आपण जर अनुसरला तर आपल्यावरील अमंगल,अरिष्ट दूर होऊन आपल्याला सुख समृद्धीचा लाभ होतो. अशी कृतार्थ भावना सर्वांची असते. म्हणून सण उत्सवांची ही परंपरा आजतागायत चालू आहे. आपण जे सण साजरे करतो त्यांची धार्मिक सामाजिक आणि पारंपारिक चालीरीतींसह जास्तीत जास्त माहिती विद्यार्थ्यांना असणे आवश्यक असले तरी ती प्रत्येकाला पूर्णपणे माहिती असतेच असे नाही म्हणूनच आम्ही विद्यालयात प्रत्येक सण साजरा करत असतो. त्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत त्या सणांचे महत्त्व समजावून देत असतो. ह्याच उद्देशाने नुकताच मुस्लिम बंधू-भगिनींचा रोजा हा महिना संपलेला आहे आणि आमच्या विद्यालयात मुस्लिम धर्माची जे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा पूर्ण एक महिन्याचे उपवास केले होते. अशा लहान वयामध्ये आपल्या धार्मिक परंपरांचे पालन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ह्या सत्कारामध्ये या विद्यार्थ्यांना विद्यालयातर्फे पुष्पगुच्छ देऊन एक भेटवस्तू देण्यात आली. पाच मुलं व पाच मुली यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी इयत्ता आठवीचा विद्यार्थी कु.अमन शहा याने अतिशय सुंदर असे मनोगत व्यक्त केले. सण उत्सवांमुळेच माणसाच्या सौंदर्यदृष्टीला आणि कलाप्रियतेला भरपूर वाव मिळत असतो. आत्मविकास प्राप्त झाल्याशिवाय माणसाला सुख मिळू शकत नाही आणि हा आत्मविश्वास निर्माण करण्यामध्ये सण-उत्सवांचा फार मोठा वाटा असतो, असे प्रतिपादन उपशिक्षक दिपक खैरनार यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
या उपक्रमाचे विद्यालयातील मुख्याध्यापक हिरामण गांगुर्डे यांनी कौतुक केले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी या उपक्रमाचे खूप कौतुक केले.