
शहाबाज शेख : इगतपुरीनामा न्यूज – संपूर्ण इगतपुरी तालुक्याला हादरवून सोडणाऱ्या टाकेद येथील सहावीच्या विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापक तुकाराम साबळे, शिक्षक गोरक्षनाथ जोशी या दोघांना पोलिसांनी रविवारी इगतपुरी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांनाही १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यापुर्वीही या परिसरात अनेकवेळा अशा प्रकारच्या घटना काही विद्यार्थीनीबरोबर घडल्या आहेत. परंतु दबाव आणून त्या घटना पोलिसांपर्यंत जाऊ दिल्या नाही अशा दबकी चर्चा लोकांमध्ये सुरु आहे. इगतपुरीचे तालुकास्तरीय अधिकारी टाकेद येथे कायम थातुरमातूर कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित असतात. मात्र विद्यार्थिनीवर अत्याचारासारखी एवढी मोठी संवेदनशील घटना घडूनही इगतपुरीचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, गटविकास अधिकारी वळवी, तहसीलदार अभिजित बारवकर यांनी संबंधित शाळेला साधी भेटही दिलेली नाही. दहावी बारावीच्या परीक्षा सुरु होणार असल्याने तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसह पालकांना दिलासा देण्याची मोठी गरज होती. पीडित मुलीच्या कुटुंबालाही भेट देण्याचे सौजन्य कोणी शासकीय अधिकाऱ्याने दाखवलेले दिसले. अशा परिस्थितीत घोटी पोलिसांमार्फत डोळ्यात तेल घालून वेगवान तपासकार्य, भेटीगाठी, कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम चोखपणे केले जाते आहे. टाकेद येथे अधूनमधून अनेक किरकोळ कार्यक्रम होतात. त्यासाठी गाजावाजा करून तालुकास्तरीय अधिकारी हजर असतात. विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणी इगतपुरीचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, गटविकास अधिकारी वळवी, तहसीलदार अभिजित बारवकर यांनी शाळेसह पीडित मुलीच्या कुटुंबाला भेट देऊन दिलासा दिलेला दिसत नाही. यामुळे टाकेद परिसरातील पालकांनी संताप व्यक्त केला आहे. परीक्षेच्या काळात विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक यांचे समुपदेशन करण्यासाठीही नियोजन केले नसल्याचे मत लोकांनी व्यक्त केले. घोटी पोलिसांची कामगिरी आणि सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.