
लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – टाकेद बुद्रुकच्या अल्पवयीन शाळकरी मुलीवर मुख्याध्यापक व शिक्षकाने अत्याचाराच्या घटनेमुळे तालुकाभरातील विद्यार्थिनी आणि महिला पालक अत्यंत घाबरून गेल्या आहेत. पोटासाठी कामावर जावे किंवा शेतमजुरी करावी की मुलींच्या सुरक्षिततेची चिंता करावी अशी द्विधावस्था वाढली आहे. महिलांमध्ये आणि सोशल मिडीयामध्ये महिला आपली भीती व्यक्त करताहेत. एवढी भयानक घटना घडून ऐन परीक्षा काळात घाबरलेल्या विद्यार्थिनी आणि त्यांच्या महिला पालक यांची भीती घालवण्यासाठी पंचायत समिती शिक्षण विभागाने काडीमात्र प्रयत्न केलेले नाहीत. परिणामी आज तालुकाभरात उपस्थितीवर दुष्परिणाम आढळून आला आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा इगतपुरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागावर अजिबात अंकुश आणि वचक नाही. नियोजनशून्यतेमुळे विद्यार्थिनी आणि महिला पालकांना धक्कादायक परिस्थितीत सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शनाचा अभाव आहे. इगतपुरीचा शिक्षण विभाग आणि अधिकारी इगतपुरी तालुक्यातील धास्तावलेल्या विद्यार्थिनी आणि पालकांना कधी आधार देणार आहे ? असा संतप्त सवाल वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते नंदूभाऊ पगारे, इगतपुरी तालुकाध्यक्ष विक्रम जगताप, तालुका निरीक्षक दादाभाऊ शिरसाठ यांनी केला आहे. प्रकरणाशी संबंधित नराधम मुख्याध्यापक आणि शिक्षकाला भर चौकात फाशी द्यावी. आरोपींची स्थावर व जंगम मालमत्ता शासनजमा करावी. शैक्षणिक पर्यवेक्षिय कामात दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षण विभागातील संबंधितांची चौकशी करून अन्यत्र बदली करावी. विद्यार्थिनी आणि महिला पालकांना सत्वर आधार देणारी कृती करावी आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. याबाबत कार्यवाही करण्यास टाळाटाळ केल्यास राज्याचे शिक्षणमंत्री ना. दादाजी भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानासमोर वंचित बहुजन आघाडी आक्रोश आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.