निलेश काळे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २६
इगतपुरी तालुक्यातील बेलगाव तऱ्हाळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी समृद्धी महामार्गासाठी संपादित झाल्या आहे. यामुळे अनेक कुटुंबातील सदस्यांना घरीच राहुन दिवस काढण्याची वेळ आली आहे. ह्या पार्श्वभूमीवर बेलगाव तऱ्हाळे येथे समृद्धीबाधित महिला, बचत गटातील महिला यांना स्वतःचा रोजगार मिळण्यासाठी जनशिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी श्री. पवार व जनशिक्षण संस्थेच्या संचालिका ज्योती लांडगे यांनी इगतपुरी पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण दिले.
बेलगाव तऱ्हाळे, धामणगाव, धामणी आदींसह अनेक गावांतील शेकडो हेक्टर जमिनी समृद्धी महामार्गामुळे संपादित झाल्या. यामुळे परिसरातील अनेक नागरिक तसेच महिला रोजगारांपासून वंचित आहेत. ह्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील जनशिक्षण संस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या संचालिका ज्योती लांडगे यांनी येथील महिलांना स्वयंरोजगारासाठी महिला सक्षमीकरण उपक्रमाअंतर्गत शिवणकामाचे प्रशिक्षण देत मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी श्री. पवार यांनी महिलांना शिवणकामाविषयी मार्गदर्शन केले. उपस्थित महिलांना संस्थेच्या वतीने सॅनिटायझर, दोन साबण, मास्क वाटप करण्यात आले. महिलांनी आपल्या अडचणी व शिवणकामाबाबत येत असलेल्या अनुभवाविषयी संस्थेच्या संचालिका श्रीमती लांडगे यांंच्याशी चर्चा करून आभार मानले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी श्री. पवार, जनशिक्षण संस्थेच्या संचालिका ज्योती लांडगे, सुखदेव मत्सागर, इगतपुरी पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, सरपंच अशोक मोरे, संतोष वारुंगसे, ग्रामपंचायत सदस्या प्रमिला वारुंगसे, सुशीला तातळे, प्रशिक्षक घोडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
समृद्धी महामार्गासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने संपादित केल्या असल्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना रोजगार उपलब्ध नाही. येथील महिलांना स्वयंरोजगार मिळावा या उद्देशाने जनशिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे महिलांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही.
- पांडुरंग वारुंगसे, माजी उपसभापती, इगतपुरी