मे महिना अखेरपर्यंत जि. प. पं. स., मनपा, नगरपरिषद निवडणुका होण्याची शक्यता : पहिल्या टप्प्यात ग्रामपंचायत निवडणुका होण्याचा अंदाज

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – तत्कालीन राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषद गटांची संख्या पूर्वीप्रमाणे करण्याचा अध्यादेश, न्यायालयीन लढाई, ओबीसी आरक्षणाचा तिढा यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुका राज्यभर रखडलेल्या आहेत. त्यात लोकसभा विधानसभा निवडणुकीमुळे ग्रामपंचायत निवडणुकाही प्रलंबित आहेत. इगतपुरी तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गट, १० पंचायत समिती गण, ६५ ग्रामपंचायती आणि इगतपुरी नगरपरिषद निवडणुकांची सर्वांना प्रतीक्षा आहे. ग्रामपंचायती, नगरपरिषद, जिल्हा परिषद गट आणि गणांची अंतिम प्रभाग रचना, आरक्षण सोडत, हरकती, सुनावणी, निर्णय ही आवश्यक प्रक्रिया तत्कालीन काळातच पूर्ण झालेली आहे. न्यायालयात सुरु असलेल्या दाव्याला कायम ठेवून आणि न्यायालयाच्या निकालानुसार ओबीसी आरक्षणाची मर्यादा पाळून निवडणुक घेण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. पहिल्या टप्प्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्यात येणार असून त्याबाबतची पूर्तता प्रशासनाने केली असल्यामुळे निवडणुकीची घोषणा लवकरच होईल अशी अपेक्षा आहे. दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपरिषद निवडणुका घेतल्या जाण्याचा अंदाज आहे. २०२५ च्या मे महिनाअखेर सर्व निवडणुका व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरु झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

लोकसभा विधानसभा निवडणुकीत महायुतीला मदत करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे राजकीय पुनर्वसन आवश्यक आहे. दीर्घकाळाच्या प्रशासक राजवटीमुळे ग्रामीण भागाचा विकास रोखला गेल्याचे सगळीकडे वातावरण आहे. निवडणुकीचा पोरखेळ आणि खेळखंडोबामुळे १० वर्ष विकास मागे पडल्याची राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संतप्त भावना आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मिनी मंत्रालय असल्याने विकासाची अनेक कामे लोकप्रतिनिधी करू शकतात. राज्यात महायुतीचे नवे सरकार सत्तारुढ झाले असल्याने रखडलेल्या निवडणुका मार्गी लागणार आहेत. हिवाळी अधिवेशन संपताच निवडणुका घेण्याबाबत मंत्रिमंडळात निर्णय होणार असल्याची शक्यता आहे. पुढील वर्षात मे महिन्याच्या अखेरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासनही तयारी करीत आहे. निवडणुकांची वाट पाहणारे सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हळूहळू पूर्वतयारी करावी अशी सूचना सर्वच पक्षांकडून करण्यात आलेली आहे. 

इगतपुरी तालुक्यातील जिल्हा परिषद गट - खंबाळे ( जुना शिरसाठे गट ), धामणगाव ( जुना खेड गट ), नांदगाव सदो, घोटी बुद्रुक, वाडीवऱ्हे
इगतपुरी तालुक्यातील पंचायत समिती गण - धामणगाव ( जुना टाकेद बुद्रुक गण), काळूस्ते, मुंढेगाव, नांदगाव सदो, वाडीवऱ्हे, घोटी, खंबाळे, कावनई ( जुना शिरसाठे गण ), बेलगाव तऱ्हाळे ( जुना खेड गण ), साकुर ( जुना नांदगाव बुद्रुक गण )
इगतपुरी तालुक्यातील निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायती - रायांबे, शेवगेडांग, धार्णोली, मुरंबी, बेलगांव कुऱ्हे, उभाडे, मालुंजे, कांचनगांव, खैरगांव, खडकेद, बारशिंगवे, पिंपळगांव मोर, वाकी, पिंपळगांव भटाटा, मायदरा धानोशी, इंदोरे, धामणी,अधरवड, कावनई, आहुर्ली, म्हसुर्ली, कोरपगांव, पाडळी देशमुख, नांदुरवैद्य, देवळे, समनेरे, सोनोशी, मांजरगांव, शेणवड बुद्रुक, खंबाळे, साकुर, आंबेवाडी, त्रिंगलवाडी, वाळविहीर, सांजेगांव, वाडीवऱ्हे, कुऱ्हेगांव, नांदगांव बुद्रुक, जानोरी, पिंपळगांव घाडगा, घोटी बुद्रुक, पिंप्री सद्रोद्दीन, भावली खुर्द, तळोशी, चिंचलेखैरे, अडसरे बुद्रुक, बेलगांव तऱ्हाळे, माणिकखांब, काळुस्ते, खेड, गोंदे दुमाला, मुकणे, पिंपळगांव डुकरा, घोटी खुर्द, भरविर खुर्द, शेणीत, वाघेरे, बोर्ली, मानवेढे, कुरुंगवाडी, आवळखेड, टाकेद बुद्रुक, धामणगांव, निनावी, टाकेद खुर्द

Similar Posts

error: Content is protected !!