भूजल पातळी घटल्याने कृषी विभागामार्फत श्रमदानातून वनराई बंधारे : इगतपुरी कृषी विभागाकडून लोकसहभागातून विविध ठिकाणी वनराई बंधारे

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील शेनवड बुद्रुक येथे कृषी विभागाने ग्रामस्थांच्या श्रमदानातून वनराई बंधारा बांधला. कृषी सहाय्यक मोहिनी चावरा यांनी बंधारा बांधण्यासाठी नियोजन केले. इगतपुरी तालुक्यात यावर्षी चांगला पाऊस झाला. परतीच्या पावसानेही नदीनाल्यांना अजून पाण्याचा प्रवाह सुरू आहे. याचा सदुपयोग करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने इगतपुरी तालुक्यात ग्रामस्थांच्या सहकार्याने श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्याचे काम हाती घेतले आहे. यातील पाण्याचा वापर रब्बी पिके, विहिरीतल्या पाणी पातळीत वाढ आणि जनावरांना पिण्यासाठी होणार असल्याचे इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी सांगितले. मंडळ कृषी अधिकारी भास्कर गीते, कृषी पर्यवेक्षक किशोर भरते, नानाभाऊ पवार, राजेंद्र काळे, महेश वामन, किरण सोनवणे, आबासाहेब अटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कृषी सहाय्यक बंधाऱ्यांचे काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या लोकसहभागातून वनराई बंधारे उपक्रमाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. याचा वापर रबी हंगामातील पिकासाठी संरक्षित पाणी व जनावरांना पिण्यासाठी आणि भूजल पातळी वाढण्यासाठी होणार आहे असे कृषी पर्यवेक्षक किशोर भरते यांनी सांगितले.

वनराई बंधारे बांधण्यासाठी काहीही खर्च येत नाही. माती, मुरूम, दगड गोटे, वाळू, सिमेंटच्या रिकाम्या गोण्यांचा वापर करून हे बंधारे बांधण्यात येत आहेत. कृषी सहाय्यक शिवचरण कोकाटे, मोहिनी चावरा, रमेश वाडेकर, अशोक राऊत, मनोहर टोपले, प्रियंका पांडूळे, जयश्री गांगुर्डे, दीपा शिंदे, वंदना शिंगाडे, संगीता जाधव, हर्षदा गिळंदे, संजना जाधव,.मोनिका जाधव, मोनिका गिळंदे, स्वप्ना राठोड, विद्या फुसे, रुपाली बिडवे, रावसाहेब जोशी, दीपक भालेराव, पुंडलिक भोये, मंगेश कोकतरे, हरीश चव्हाण, योगेश दाते यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्याचे काम केले. मायदरा, वाघ्याचीवाडी, बेलगाव तऱ्हाळे, उभाडे, शेनवड बूद्रुक, बोरटेंभे, कुशेगाव, निनावी, पिंपळगाव भटाटा, कुर्णोली, भावली, वाळविहिर, बिट्रुर्ली, वाकी, गडगडसांगवी, लहांगेवाडी, मोगरे, कावनई, कृष्णनगर, शेणित, कवडदरा, कुऱ्हेगाव आदी गावात वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत.

Similar Posts

error: Content is protected !!