अफाट कष्ट करून सामान्य शेतकऱ्याचा “दीप” झाला न्यायाधीश

आईवडिलांच्या पुण्याईमुळे मिळाला न्यायाधीशपदाचा मान

ज्ञानेश्वर महाले, इगतपुरीनामा न्यूज, दि. ८

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामान्य शेतकऱ्याचा मुलगा संदीप भास्करराव मोरे हा इच्छाशक्ती व जिद्दीच्या बळावर उत्तुंग यश मिळवत न्यायाधीश झाला. त्याचे हे यश त्र्यंबकेश्वर तालुक्यासह नाशिक जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवत ग्रामीण युवकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. नुकतीच नंदुरबार येथे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर म्हणून त्याची नियुक्ती झाली आहे. २०१९ च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून त्यांची निवड झालेली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिला न्यायाधीश म्हणून संदीप मोरे याचे नाव लिहिले गेले असल्याने आईवडिलांना आभाळाएव्हढा आनंद झाला आहे.

त्र्यंबकेश्वर परीसरात वास्तव्यास असलेले भास्करराव मोरे हे सामान्य शेतकरी आहेत. आपल्या मुलांनी देशसेवा करण्यासाठी कोणत्याही क्षेत्रात लौकिक मिळवावा अशी त्यांची नेहमीच अपेक्षा होती. त्यानुसार त्यांनी मुलांमध्ये स्वप्नांना जागे करण्यासाठी कष्ट करून शिक्षण दिले. त्यांचा मुलगा संदीप भास्करराव मोरे याने २०१९ च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उज्वल यश मिळवले. यामध्ये तो न्यायाधीश झाला. हे स्वप्न पूर्ण झाल्याचे पाहून मोरे परिवारातील सदस्यांच्या डोळ्यात अवघे कुशावर्त जमा झाले.

भास्करराव मोरे यांनी अल्पशा शेतीवर कुटुंबाची गुजराण करीत असतांना मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. त्यानुसार संदीप मोरे यानेही ठिकठिकाणी छोटेमोठे काम करून शिक्षण घेतले. तुपादेवी ते त्र्यंबकेश्वर पायपीट करून आईवडिलांच्या स्वप्नासाठी शिक्षणात खंड पडू दिला नाही. २००९ मध्ये एलएलबी पूर्ण करून संदीपने वकिलीची सनद मिळवली. त्यानुसार नाशिक जिल्हा न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयात १२ वर्ष वकिली केली. १२ वर्षाच्या वकिलीचे पूर्ण तप पाहता त्याने अतिशय संस्मरणीय कामगिरी केली. २०१९ ला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रचंड अभ्यास करून उत्तुंग यश मिळवले. आता सध्या संदीपची नियुक्ती नंदुरबार येथे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर म्हणून झाली आहे. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मुलगा संदीप ह्याने आमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी अमाप कष्ट घेतले. रात्रीचा दिवस करून अपेक्षेप्रमाणे आमचे नाव सर्वत्र मोठे केले. संदीप सारखा मुलगा न्यायाधीश झाल्याचा आनंद शब्दांत व्यक्त करता येणे आमच्यासाठी अतिशय कठीण आहे. आमच्या डोळ्यांतील अश्रुधारा आनंदाच्या आहेत.
- मंदाबाई भास्करराव मोरे, संदीपची आई
जिद्द, परिश्रम, संकल्प, ध्येय निश्चिती आणि आईवडिलांचे आशीर्वाद ह्या पंचसूत्रीच्या बळावर न्यायाधीशपदाचा मान मिळाला. एवढ्या मोठ्या पदाचा सन्मान माझ्या आईवडिलांची पुण्याई असल्यानेच लाभू शकला. त्याचे सार्थक करणे माझे कर्तव्य आहे.
- संदीप भास्करराव मोरे, नवनियुक्त न्यायाधीश