निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांची अवैध व्यवसायांविरोधात जिल्हाभर व्यापक कारवाई : आचारसंहिता काळात ७ कोटी ८२ लाखांचा मुद्धेमाल जप्त : जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांचे आदेश झाले लागू

इगतपुरीनामा न्यूज –  विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू असून त्या पार्श्वभुमीवर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाकडुन नाशिक जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आणि सार्वत्रिक निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्हयात सद्यस्थितीत ४८ सराईत गुन्हेगार हद्दपार आहेत. एमपीडीए कायद्यान्वये २ सराईत गुन्हेगार स्थानबध्द आहेत. १४ देशी बनावटीचे पिस्टल, ३७ जिवंत काडतुसे, ४३ तलवारी, ९ कोयते/चॉपर, चाकु अशी अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. भारतीय न्याय संहिता कलम १२६ (हौ.प्र.सं. १०७) अन्वये ३५५६ इसमांविरूध्द प्रतिबंधात्मक कारवाई कारवाया, कलम १२८ (फौ.प्र.सं. १०९) अन्वये ४१ इसमांविरुध्द कारवाया, कलम १२९ (फौ.प्र.सं.११०) अन्वये २७१ इसमांविरूध्द कारवाया, कलम १६८ (फौ.प्र.सं. १४९) अन्वये १३७२ इसमांविरुध्द कारवाया, कलम १६३ (फौ.प्र.सं. १४४) अन्वये २३२ इसमांविरुध्द कारवाया करण्यात आल्या आहेत. 

अवैध दारूचे ११९१ गुन्हे दाखल असून हस्तगत / नाश केलेल्या मालाची किंमत १ कोटी ४४ लाख ४० हजार ७५८ रुपये आहे. प्रतिबंधीत गुटखा बाबत ५२ गुन्हे दाखल करून ५२ आरोपी अटक आहेत. ९३ लाख १९ हजार ४१५ रुपयांचा प्रतिबंधीत गुटखा हस्तगत करण्यात आलेला आहे. अंमली पदार्थचे ७ गुन्हे दाखल करून २६ लाख ६१ हजार ५०४ रूपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. गुन्ह्यात जप्त केलेल्या वाहनांची किंमत २ कोटी ४६ लाख ३७ हजार आहे. रोख २ कोटी २२ लाख ४७ हजार ८४०  रूपये रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे. आदर्श आचारसंहिते दरम्यान एकुण ७ कोटी ८२ लाख ३१ हजार ४३९ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. २० तारखेच्या मतदानाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी नाशिक यांनी संपूर्ण जिल्ह्यात आज सायंकाळी ७ नंतर प्रचार कालावधी संपल्यानंतर जे इसम त्या मतदार संघाचे मतदार नाहीत असे राजकीय कार्यकर्ते, पक्ष कार्यकर्ते, मिरवणुकीतील कार्यकर्ते, प्रचार कार्यकर्ते यांना मतदार संघामध्ये उपस्थित राहता येणार नाही असे आदेश जारी केले आहे. ह्या आदेशाचा भंग करणाऱ्या इसमांच्या विरोधात भरारी पथक व स्थिर सर्वेक्षण पथक यांच्या माध्यमातुन भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम २२३ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.नाशिक जिल्ह्यात निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस वाहनांवर ११० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. ड्रोन कॅमेऱ्याचा वापर देखील करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आदर्श आचारसंहितेचे कोटेकोर पालन करावे असे आवाहन नाशिक ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!