गरिबीच्या झळा आणि पोटात भुकेच्या कळा सोसणाऱ्यांना “जनसेवा” कडून मायेचा लळा : शेकडो कुटुंबांना थंडीपासून बचावासाठी ब्लॅंकेटचे वाटप संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. १२

गरिबीच्या झळा आणि पोटात भुकेच्या कळा सोसणाऱ्या शेकडो कुटुंबांना नेहमीच निसर्गाचा फटका बसत असतो. असे असतांनाही जगण्याची भ्रांत असणारी ही निराधार कुटुंबे चकार शब्द न काढता सहनशीलतेने जगण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. अशी अनेक निराधार कुटुंबे जीवघेण्या कडाक्याच्या थंडीमुळे गारठून गेली आहेत. सगळे शरीरच गोठण्याच्या परिस्थितीत असतांना इगतपुरी येथील जनसेवा प्रतिष्ठानने उबदार सामाजिक कार्याने निराधारांना आपुलकीने मायेची ऊब दिली आहे. घटकर्णा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, मनोज शहा, चंद्रिकाबेन गाला व नितीनभाई कोठारी यांच्या सहकार्याने अतिदुर्गम डोंगराळ भागातील निराधार आदिवासी बांधवांना थंडीपासून रक्षण करण्यासाठी दर्जेदार ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. कुडकूडणाऱ्या शेकडो निराधारांना ब्लॅंकेट मिळाल्याने त्यांनी जनसेवा प्रतिष्ठानच्या सदस्यांना भरभरून आशीर्वाद दिले आहेत.

इगतपुरी तालुक्यात अवकाळी पावसामुळे नेहमीपेक्षा जास्त जोरात थंडीची लाट उसळलेली आहे. यामुळे ज्यांना कोणताही आधार नाही अशी कुटुंबे गारठली आहेत. आधीच गरिबीची परिस्थिती, रोजगाराचा प्रश्न, जगण्याची कसोटी यामुळे थंडीत बचावासाठी पांघरून मिळत नव्हते. घटकर्णा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, मनोज शहा, चंद्रिकाबेन गाला व नितीनभाई कोठारी यांच्या सहकार्याने जनसेवा प्रतिष्ठान इगतपुरीच्या वतीने शेकडो गरजू निराधार आदिवासी बांधवांना उबदार आणि दर्जेदार ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. पहिल्या दिवशी इगतपुरी तालुक्यातील गव्हांडे येथील गरजू आदिवासी बांधवांसाठी थंडीपासून बचाव व्हावा म्हणून १३६ कुटुंबाना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर, ताराचंद भरिंडवाल, प्रकाश नावंदर, शैलेश शर्मा, TV9 चे प्रतिनिधी शैलेश पुरोहित, सागर परदेशी, संदिप गायकवाड, प्रशांत खरात, कुरुंगवाडी/गव्हांडे ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच रमेश फोडसे आदी उपस्थित होते.

दुसऱ्या दिवशी इगतपुरी पंचायत समिती सभागृहात ब्लॅंकेट वाटपाचा कार्यक्रम झाला. ह्या कार्यक्रमात इगतपुरी तालुक्यातील प्रत्येक गावातील गरजू व्यक्तींना बोलावण्यात आले होते. सहाय्यक गटविकास अधिकारी अमित भुसावरे, बालविकास प्रकल्पाधिकारी पंडित वाकडे, सहाय्यक प्रकल्पाधिकारी वंदना सोनवणे, गटशिक्षणाधिकारी राजेश तायडे, कक्ष अधिकारी छाया पाटील, भाजप नेत्या वैशाली आडके, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर, सदस्य ताराचंद भरिंडवाल, नितीन कोठारी, शांतीलाल चांडक, प्रकाश नावंदर, विजय गुप्ता, कैलास विश्वकर्मा, शैलेश शर्मा, सुभाष भारती, दिनेश लुणावत, संदीप गायकवाड, पत्रकार भास्कर सोनवणे यांच्या हस्ते उपस्थित गरजूंना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. उपस्थित लाभार्थ्यांनी जनसेवा प्रतिष्ठानची कृतज्ञता व्यक्त केली. राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्ताने यावेळी उपस्थितांनी अभिवादन केले. राष्ट्रीय युवादिनाच्या पार्श्वभूमीवर स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!