राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य : युवा सेनेकडून वृक्षारोपणाची गांधीगिरी करून आंदोलन

वाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २९

इगतपुरी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाचे रूपांतर मातीमय अवस्थेत झाले आहे. इगतपुरी मुंबई महामार्गावरील रस्त्याची दुर्दशा अतिशय जीवघेणी झाली आहे. त्यासंदर्भात आज  युवासेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित अधिकारी वर्गाची कानउघाडणी करत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी खड्ड्यात वृक्षारोपण केले.

मुंबई नाशिक महामार्गाची सध्या अक्षरशः चाळण झालेली आहे. यामुळे अनेक निष्पाप नागरिकांना अपंगत्व तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर युवासेनेच्या वतीने मोठ्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करुन गांधीगिरी केली. आता तरी संबंधित विभागाने जागे होत याकडे गांभीर्याने लक्ष देऊन महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे. या महामार्गावर पावसाळ्यात नेहमीच मोठ मोठे खड्डे पडतात. त्यामुळे या मार्गाची ओळख ‘खड्डेयुक्त मार्ग’ अशी झाली आहे. या दुरवस्थेमुळे अनेक निष्पाप नागरिकांना अपंगत्व प्राप्त झाले आहे तर अनेकांना जीव गमवावा लागला आहे. रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. यातून अनेकदा छोटे-मोठे अपघात घडत आहे.

यावेळी युवासेना इगतपुरी उपतालुकाप्रमुख संदीप गव्हाणे, युवासेना इगतपुरी तालुका समन्वयक आकाश खारके, शिवसेना उपशहरप्रमुख रमेश खातळे, विद्यार्थी सेनेचे सागर परदेशी, विक्रम गोवर्धने, दिवाजी धोंगडे, गणेश पारधी, योगेश धोंगडे, गोकुळ धोंगडे आदी युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.