इगतपुरीनामा न्यूज – इंदिरा काँग्रेसचे उमेदवार लकीभाऊ जाधव यांच्या प्रचारार्थ इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील तरुणांची फौज रणधुमाळीत उतरली आहे. आपल्या पातळीवरून समक्ष, रॅली, सोशल मीडिया, गाठीभेटी, फोनद्वारे संवाद साधून मतदारांना लकीभाऊ जाधव यांना निवडून देण्याचे आवाहन केले जाते आहे. युवकांच्या प्रचारामुळे खऱ्या अर्थाने ‘जय जवान”चा नारा सार्थक झाल्याची भावना मतदारांनी व्यक्त केली. सोशल मीडियामुळे तरुण पिढी जागरूक झाली असल्याने लकीभाऊ जाधव यांच्यासाठी सर्वांनी निवडणुकीत धडकपणे एंट्री केल्याचे दिसते. काँग्रेस उमेदवार लकीभाऊ जाधव यांनी विद्यार्थी, युवक, बेरोजगार तरुण, शेतकरी आणि सामान्य माणसाला आनंदी करण्यासाठी अविरत प्रयत्न केले आहेत. असा क्रियाशील आमदार इगतपुरीतुन विधानसभेत जाऊन तरुणांचे प्रभावी नेतृत्व उत्तमप्रकारे करील. म्हणून दोन्हीही तालुक्यातील तरुणांची फौज मैदानात उभी ठाकली आहे. “मीच आमदार.. मीच लकीभाऊ” असा नारा देत लकीभाऊ जाधव यांना आमदार म्हणून निवडून देऊन इतिहास रचला जाईल असा तरुणांना विश्वास आहे.
महाविकास आघाडीतील इंदिरा काँग्रेस, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आदी मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार लकीभाऊ जाधव यांना मतदारसंघात उत्स्फूर्त पाठिंबा लाभत आहे. सर्वच पक्षातील राजकीय मक्तेदारी आणि स्वयंघोषित सरदारांनी तरुण पिढीला कधीही योग्य संधी मिळवून दिली नाही. परिणामी युवा वर्ग राजकारणापासून अलिप्त होता. आता राजकीय मक्तेदारीवाले सर्वपक्षीय पदाधिकारी श्रीमंत उमेदवारांकडे गेले आहेत. त्यामुळे युवकांना राजकारणात नामी संधी आली आहे. त्यानुसार युवकांसाठी अखंड कार्यरत असलेले लकीभाऊ जाधव हे तरुणांचे आदर्श असल्याने त्यांना आमदार करण्यासाठी युवावर्ग पेटून उठला आहे. गावोगावी युवकांनी आपल्या पद्धतीने सहभागी होऊन लकीभाऊला संधी द्यावी असा प्रचार सूरू केला आहे. यामध्ये रोजच तरुणांची वाढ होत असून युवाशक्तीची ताकद दाखवून दिली जात आहे. कमी कालावधीत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी तरुणांनी स्वयंस्फूर्तीने नियोजन केले आहे. लकीभाऊ जाधव यांच्यासाठी पेटून उठलेल्या युवकांनी ही निवडणूक हाती घेतल्याने चुरस वाढली आहे.