आदिवासी भागातील मतदारांनी रांगा लावून बजावला मतदानाचा हक्क : मतदानाचा वाढलेला टक्का उमेदवारांना धडकी भरवणारा

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील आदिवासी दुर्गम अतिदुर्गम भागातील मतदान केंद्रावर अभूतपूर्व उत्साहात मतदान सुरु आहे. अनेक केंद्रावर महिला आणि पुरुषांनी गर्दी केली असून शेवटच्या टप्प्यात मतदारांनी आपला हक्क बजावण्यासाठी गर्दी वाढवली आहे. एल्गार कष्टकरी संघटनेच्या सभासदांनी मतदान केंद्रावर सामुदायिकपणे एकाचवेळी जाऊन लोकशाहीच्या उत्सवात योगदान दिले. आदिवासी भागासह इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघात झपाट्याने वाढलेला मतदानाचा टक्का प्रस्थापित उमेदवारांची झोप उडवणारा ठरू शकतो. अखेरच्या वेळेपर्यंत या मतदारसंघात ६५ ते ७५ टक्के मतदान होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. उन्हामुळे दुपारी मतदानाकडे पाठ फिरवलेले मतदार मतदानासाठी केंद्रावर आले आहेत. विहित वेळेच्या आत आलेल्या मतदारांना टोकन देऊन मतदान करून देण्यात येईल असे निवडणूक नायब तहसीलदार वर्षा वाघ यांनी सांगितले. त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या आदिवासी भागात रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरु राहील अशी शक्यता वाढलेल्या गर्दीमुळे निर्माण झाली आहे. मतदानाचे जास्त महत्त्व आदिवासी कष्टकरी यांना आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आज शेकडो एल्गार कष्टकरी संघटनेच्या सभासदांनी एकत्रित मतदान केले. ही एल्गार कष्टकरी संघटनेची शिकवण आहे. शहरी सुशिक्षित समजणाऱ्यानी या आदिवासी कष्टकरी बांधवांचा आदर्श घ्यावा अशी प्रतिक्रिया संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांनी दिली.

Similar Posts

error: Content is protected !!