इगतपुरी विधानसभा निवडणुकीत कोण ठरेल ‘लकी’ ? : ‘अशी’ असेल राजकीय समीकरणे

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी विधानसभा मतदारसंघ लक्षणीय लढतीसाठी प्रसिद्ध आहे. माघारीनंतर १७ उमेदवारांचे भवितव्य मतदाराच्या हाती आले आहे. सर्वाधिक इच्छुक असणाऱ्या महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने लकीभाऊ जाधव यांना मैदानात उतरवले आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे नाराज होऊन शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या माजी आमदार निर्मला गावित पदर खोचून अपक्ष उभ्या ठाकल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाची हक्काची जागा असताना पक्षांतर करून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात आलेले माजी आमदार हिरामण खोसकर यांना महायुतीने उमेदवारी बहाल केली. यामुळे शिवसेनेचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ हे मनसेच्या इंजिनात बसले. अर्थात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बंडाचा झेंडा फडकवला गेल्याने मतविभाजन संवेदनशील मुद्धा ठरला आहे. अशा परिस्थितीत इगतपुरी  मतदारसंघातील इगतपुरी तालुक्यात ७७ हजार ७१३ पुरुष, ७५ हजार १३४ महिला, इतर ४ असे एकूण १ लाख ५२ हजार ८५१ मतदार आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यात ६५ हजार ५७ पुरुष, ६१ हजार ९६७ महिला, इतर १ असे एकूण १ लाख २७ हजार २५ मतदार आहेत. दोन्हीही तालुके मिळून २ लाख ७९ हजार ८७६ मतदार इगतपुरी विधानसभेतील २०२४ चा आमदार म्हणून कोण ‘लकी’ असेल हे ठरवणार आहेत. तरुण नेतृत्व विरुद्ध तीन माजी आमदार यांच्या लढाईत विजय मिळवण्यासाठी व्युव्हरचना सुरु झालेली आहे. महायुतीतील शिवसेना शिंदे गट, भाजपा आणि मित्रपक्षाची अंतर्गत भूमिका, महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा गटाची अपक्ष निर्मला गावित यांना उघड साथ पाहता त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षातील श्रेष्ठत्व स्वतःच संपवून घेतले आहे. इंदिरा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बहुतांश नेत्यांनी  आघाडीधर्म पालन करायचे ठरवलेले आहे. असे असले तरी आघाडी आणि युतीचे नेते ऐनवेळी भूमिका बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील समीकरणे एकमेकांना पाडापाडीची नांदी ठरतील हेही नाकारता येणार नाही. तीनही माजी आमदारांचे भवितव्य ‘लक’ फॅक्टरवर आधारित असल्याने नेमकं कोण ‘लकी’ ठरेल याची जिल्ह्यात उत्सुकता आहे. 

इंदिरा काँग्रेसचे उमेदवार लकीभाऊ जाधव हे तरुण युवा मतदारांचे प्रतिबिंब असून मूळ काँग्रेस विचारधारा असणाऱ्या मतदारांची संख्या, अल्पसंख्यांक मते, स्वतःच्या समाजाची मते, हरसूल भागातील मतदारांचे सहकार्य ही त्यांची शक्तीस्थाने आहेत. गरीब विरुद्ध धनाढ्य असा लढा निर्माण झाला असल्याने लकीभाऊ जाधव यांनी मोठी चूरस उभी केली आहे. मागील निवडणुकीत त्यांना १० हजार मते मिळून ते तिसऱ्या स्थानावर होते. विद्यमान आमदार हिरामण खोसकर राष्ट्रवादीचे घड्याळ घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत. पाच वर्षातील कोट्यावधीची विकासकामे, मोठा जनसंपर्क, पदाधिकाऱ्यांचा मोठा ताफा, लाडकी बहीण योजना आदी त्यांची बलस्थाने आहेत. मागील निवडणुकीत त्यांनी निर्मला गावित यांच्या विरोधातील एकजुटीने मिळवलेली ८६ हजार ५६१ मते विभाजनाचा फटका बसून निश्चितच कमी होतील. त्यांनी विजय मिळवण्यासाठी मोठ्या ताकदीने नियोजन केल्याचे दिसते. माजी आमदार निर्मला गावित यांना मागच्या निवडणुकीत एकसंघ शिवसेनेच्या तिकिटावर ५५ हजार मते मिळाली होती. आता त्या अपक्ष म्हणून ताकदीने लढा देत आहेत. त्यांनी दहा वर्ष कार्यकाळात केलेला शाश्वत विकास त्यांची जमेची बाजू आहे. शिवसेना उबाठा पदाधिकारी आणि त्यांचे स्वतःचे बलस्थान असणारे प्रचंड कार्यकर्ते त्यांच्या विजयासाठी खंबीरपणे काम करत आहेत. २०१९ च्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे योगेश शेवरे यांना ६५६६ मते मिळाली होती. आता माजी आमदार काशिनाथ मेंगाळ मनसेची उमेदवारी करत आहेत. स्वतःचा समाज, नाराज शिवसेना नेते, त्यांचे चाहते आणि जनसंपर्क पाहता मेंगाळ नक्की चमत्कार करतील असा पक्षाला विश्वास आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे भाऊराव डगळे, स्वराज्यचे शरद तळपाडे, जन जनवादी पार्टीचे अनिल गभाले, बसपाचे धनाजी टोपले, पिसन्टस अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडियाचे अशोक गुंबाडे, भारत आदिवासी पक्षाचे कांतीलाल जाधव, स्वाभिमानी पक्षाच्या चंचल बेंडकुळे, अपक्ष उमेदवार बाळासाहेब उर्फ जयप्रकाश झोले, भगवान मधे, बेबी ( ताई ) तेलम, शंकर जाधव, विकास शेंगाळ, कैलास भांगरे यांनीही मैदानात उडी घेतली आहेत. एकंदरीत परिस्थिती पाहता इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील होणारा आमदार हा मतविभाजनाच्या परिणामानेच निश्चित होणार आहे. या सर्व उमेदवारांचे राजकीय भविष्य २० नोव्हेंबरला मतदान यंत्रात बंद होईल.

  • २०१९ ला उमेदवार निहाय मिळालेली मते 
    हिरामण खोसकर,काँग्रेस : 86561 विजयी 
    निर्मला गावित, शिवसेना : 55006 पराभूत 
    लकीभाऊ जाधव, वंचित बहुजन आघाडी : 9975
    योगेश शेवरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना : 6566
    शिवराम खाणे, भारतीय ट्रायबल पार्टी : 1461
    दत्तात्रय नारळे, अपक्ष 767
    यशवंत पारधी, अपक्ष 1278
    विकास शेंगाळ, अपक्ष 1110
    शैला झोले, अपक्ष 1506
    नोटा : 3059
    पोस्टल अवैध – 47

Similar Posts

error: Content is protected !!